राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचणे हे माझे वैयक्तिक यश नाही, तर देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीचे यश आहे. भारतातील गरीब केवळ स्वप्ने पाहू शकत नाही, तर ती पूर्णही करू शकतो. राष्ट्रपतीपदी माझी झालेली निवड हा त्याचा पुरावा आहे, असे उद्गार शपथ ग्रहण सोहळय़ानंतर संसदेच्या सदस्यांसमोर केलेल्या पहिल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले.
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी शपथ ग्रहण केली. संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये झालेल्या ऐतिहासिक सोहळय़ात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसण्याची संधी दिल्याबद्दल मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सदनांमधील आणि राज्यांच्या विधिमंडळातील सदस्यांचे आभार मानले.
गरीब घरातील, दुर्गम आदिवासी भागातून आलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचू शकते, ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे, असेही मुर्मू म्हणाल्या.
वर्षांनुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या गरीब, दलित, मागास, आदिवासींना माझ्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळाले आहे. माझ्या निवडणुकीला देशातील गरिबांचा आशीर्वाद लाभला आहे. माझा विजय देशातील कोटय़वधी महिला-मुलींची स्वप्ने आणि क्षमता प्रतिबिंबित करतो. तरुण आणि महिलांच्या हिताला मी सर्वाधिक प्राधान्य देईन, अशी ग्वाही मुर्मू यांनी दिली. मी आदिवासी समाजातील आहे. नगरसेवकापासून राष्ट्रपतीपदापर्यंत विविध घटनात्मक पदे सांभाळण्याची संधी मला मिळाली, हे लोकशाहीची जननी असलेल्या भारताचे मोठेपण आहे. महिलांनी अधिकाधिक सक्षम व्हावे आणि देशाच्या प्रत्येक क्षेत्रात विकासातील आपले योगदान वाढवत राहावे, असे आवाहनही राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.
‘‘जोहर!’’ अशा स्थानिक बोलीभाषेत मुर्मू यांनी देशवासीयांना शुभेच्छा देत हिंदीत भाषणाची सुरुवात केली. देशवासीयांचा स्नेह, विश्वास आणि पाठिंबा ही कर्तव्ये पार पाडण्यासाठी माझी सर्वात मोठी ताकद असेल, असे त्या म्हणाल्या. आपल्या १८ मिनिटांच्या भाषणात मुर्मू यांनी गरीब, आदिवासी, शाश्वत विकास, केंद्र सरकारचे ‘डिजिटल इंडिया’ आणि व्होकल फॉर लोकल उपक्रम, त्याचबरोबर करोना साथीची हाताळणी यांसह अनेक मुद्यांना मुर्मू यांनी स्पर्श केला.
शपथविधी सोहळय़ाआधी मुर्मू यांनी सोमवारी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार म्हणून मुर्मू यांनी विरोधकांचे सर्वसंमत उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला.
राष्ट्रपती म्हणाल्या..
* देश स्वातंत्र्याची पन्नास वर्षे साजरा करत असताना माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली, आज स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत माझ्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारत आगामी २५ वर्षांतील आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज होत असताना, या ऐतिहासिक काळात मी राष्ट्रपती झाले आहे.
* करोना साथीविरोधात संघर्ष करण्याच्या देशाच्या क्षमतेमुळे जगभरात भारताची विश्वासार्हता वाढली. देशाने २०० कोटी लसमात्रांचा विक्रम केला. या संपूर्ण लढाईत जनतेने दाखवलेला संयम, धैर्य आणि त्यांचे सहकार्य हे समाज म्हणून आपल्या वाढत्या सामर्थ्यांचे आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे.
* नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांसारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी देशाचा अभिमान उंचावत आदर्श घालून दिला आहे.
* संथाल क्रांती, पाईका क्रांती, कोळसा क्रांती आणि भील क्रांती यांनी स्वातंत्र्यलढय़ातील आदिवासींचे योगदान अधिक बळकट केले. सामाजिक उत्थानासाठी आणि देशासाठी ‘धरती आबा’ बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.
* हजारो वर्षांपासून निसर्गाशी एकरूप होऊन जीवन पुढे नेणाऱ्या आदिवासी परंपरेत माझा जन्म झाला. त्यामुळे माझ्या आयुष्यात जंगल आणि पाणवठय़ांचे महत्त्व मला कळले आहे. आपण निसर्गाकडून संसाधने घेतो आणि तितक्याच आदराने निसर्गाची सेवा करतो.
* २६ जुलैला कारगिल विजय दिवस असून हा दिवस सैन्यदलाचे शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. त्यानिमित्त देशाच्या सशस्त्र दलांना आणि नागरिकांना शुभेच्छा देते.
शिंदे-फडणवीस पहिल्या रांगेत
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथविधी सोहळय़ात पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आदी मान्यवर बसलेले होते. मुर्मू यांच्या ओदिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक सोहळय़ात सहभागी झाले होते. शपथविधी सोहळय़ाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयातील न्यायूमूर्ती आणि दोन्ही सदनांतील सदस्यही उपस्थित होते.
कमी वयात सर्वोच्चपदी
स्वतंत्र भारतात जन्मलेल्या मुर्मू या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. आत्तापर्यंत झालेल्या राष्ट्रपतींमध्ये सर्वात कमी वयात (६४) देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर निवड झालेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. तसेच त्यांच्या रूपाने आदिवासी समाजातील पहिली व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाली आहे.
माझी राष्ट्रपतीपदाची निवड तरुणांना नव्या वाटेवर चालण्याचे सामर्थ्य देणारी आहे. प्रगतिशील भारताचे नेतृत्व करताना मला अभिमान वाटतो. माझा विजय कोटय़वधी महिला-मुलींची स्वप्ने प्रतिबिंबित करतो. तरुण आणि महिलांच्या हिताला मी प्राधान्य देईन.
– द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती