आज दि.१९ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

“आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय,” दहीहंडी उत्सवात फडणवीसांचे तुफान भाषण

राज्यभरात दहींहडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. या उत्सवाला वेगवेगळ्या पक्षांचे नेतेदेखील उपस्थिती दर्शवत आहेत. भाजप नेते प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोविंदा आता खेळाडू आहेत. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, असे सांगितले. तसेच सर्व सविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता मोकळं-मोकळं वाटतंय. छान – छान वाटतंय, असं मिश्किल भाष्यदेखील केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे इतर नेतेदेखील उपस्थित होते.

तृणमूल काँग्रेसच्या ‘कातडी सोलू’ला भाजपाचे ‘जोड्याने मारू’ने उत्तर; पश्चिम बंगालमधील राजकारण तापले

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या पार्थ चटर्जी आणि अनुब्रत मंडल या दोन दिग्गज नेत्यांवर वेगवेगळ्या आरोपांखील कारवाई करण्यात आल्यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून भाजपावर कठोर शब्दांत टीका करण्यात येत आहे. याच टीकेला उत्तर देताना असताना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी “लवकरच जनता त्यांना बुटाने मारणार आहे,” असे विधान केले आहे. याधी सुगतो रॉय यांनी जे पक्षाला (तृणमूल काँग्रेस) बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची कातडी सोलून बुट तयार करू, असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्याला उत्तर म्हणून दिलीप घोष यांनी वरील विधान केले आहे

“राष्ट्रवादीतील पाच नेत्यांची चौकशी करायची आहे” भाजपाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. असे असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसून २०१९ मध्ये एसीबीने दिलेल्या क्लीन चिटबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. लवकरच त्यांची नावे देशपातळीवर कळवणार आहोत, असे निंबाळकर म्हणाले आहोत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

बापरे! आता मासे-खेकड्यांनाही कोरोना? कोव्हिड टेस्टचा VIDEO आला समोर

कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत सावध केलं आहे. त्यात आता चिंतेत भर टाकणारा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मासे आणि खेकड्यांचीही कोरोना टेस्ट केली जाते आहे. त्यामुळे मासे-खेकड्यांनाही कोरोना झाला की काय? सी-फूडमधूनही कोरोनाचा धोका आहे की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. या व्हिडीओमुळे दहशत वाढली आहे.माणसात कोरोना कुठून आला हे अद्याप माहिती नाही. तो वटवाघळातून किंवा लॅबमधून आला असावा अशा दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत. माणसांप्रमाणे काही प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची मोजकी प्रकरणं समोर आली. आता तर मासे-खेकड्यांनाही कोरोना झाला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण या जीवांच्या कोरोना टेस्टचा व्हिडीओ समोर आला आहे.

प्रेमासाठी आईचाच गळा घोटला; लेकीच्या कृत्याने गडचिरोलीत खळबळ

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आईकडून तिला सतत होणारी रोकटोक आणि आईचा कडक व्यवहारामुळे त्या तरुणीने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.या प्रकारानंतर पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. अहेरी येथील निर्मला आत्राम हिचे पती पोलीस दलात असताना वीस वर्षांपूर्वी माओवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. त्या घटनेनंतर निर्मला यांनी स्वतःच्या मुलीसह अहेरी येथे राहून घरकाम करून स्वतःचा आणि मुलीचा उदरनिर्वाह केला.

अशीही मर्कटलीला ; माकडाने असं काही केलं की पोलीस आले धावत-पळत

 ‘माकडाच्या हाती कोलीत’ ही म्हण बरीच प्रचलित आहे. पण अमेरिकेतील कॅलिफोर्नियात असणाऱ्या एका प्राणिसंग्रहालयातील माकडाच्या हाती फोन लागल्यानंतर त्यानं तर चक्क पोलिसांनाच कामाला लावलं. फोनवर त्या माकडानं 911 हा क्रमांक डायल केला. पोलिसांना फोन गेल्यानंतर ते धावतपळत घटनास्थळी आले. पण तिथं आल्यावर माकडानं फोन लावल्याचं कळताच पोलिसही चकित झाले. ‘टीव्ही 9 हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

रिलायन्सच्या गुजरातमधील प्राणीसंग्रहालयाविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे स्थापित झालेल्या ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर सोसायटी द्वारे गुजरातच्या जामनगरमधील प्राणीसंग्रहालयाविरुद्ध एक जनहित याचिका दाखल दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. GZRRC विरुद्ध लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये “कोणतेही तर्क किंवा आधार” नव्हते. तसेच ते “बातमी अहवालांवर आधारित” होते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

असा होणार ‘देवमाणूस 2’ चा शेवट; मालिका उत्कंठावर्धक वळणावर

झी मराठीवरील ‘देवमाणूस 2’ मधील ट्विस्टची मालिका काही थांबायला तयार नाही.  अजितकुमार एकामागे एक  खून करत आहे पण इन्स्पेक्टर जामकर मात्र त्याला अटक करण्यात अपयशी ठरले आहेत.  या मालिकेत सारखे ट्विस्ट आणून मालिका आणखी रंजक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवमाणूस २ आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोचली आहे.  पण आता मात्र अजितकुमारचा खेळ खल्लास होणार असल्याचं कळत आहे. कारण लोकांचा हा देवमाणूस लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडणार आहे.  झी मराठीवर नुकताच नवीन मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून देवमाणूस संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता अखेर देवमाणसाचा शेवट कसा होणार याची माहिती समोर आली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. नितीश कुमार राज्यातील दुष्काळीस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेनंतर गया प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा

सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत या काराईचा निषेध केला आहे. दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात येत आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.