मुंबईतील एका अवलिया माणसाची कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या अवलियाचं नाव पास्कल सल्धाना असं आहे. या अवलियाने कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी पत्नीच्या सहमतीने तिचे दागिने विकले आणि ऑक्सिजनचा मोफत पुरवठा केला. पास्कल यांचं काम अजूनही सुरुच आहे
पास्कल यांनी 80 हजारात पत्नीचे दागिने विकले
पास्कल सल्धाना हे 18 एप्रिलपासून रुग्णांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठी त्यांनी पत्नीचे दागिने विकली. त्यातून त्यांना 80 हजार रुपये मिळाले. त्याच पैशांच्या आधारे त्यांनी ऑक्सिजन मोफत वाटण्याचं काम सुरु केलं. राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवटडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजन बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. अनेक रुग्णांचा आक्सिजन अभावी तडफडून मृ्त्यू झाल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. या भयान परिस्थितीत रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळावा यासाठी पास्कल यांनी रुग्णांपर्यंत मोफत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची सेवा सुरु केली.
पास्कल सल्धाना यांचा मुंबईत मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय आहे. पण लॉकडाऊन काळात त्यांच्या मंडप डेकोरेटर्सच्या व्यवसायात अर्थातच मंदी आली आहे. त्यांच्या पत्नीचं गेल्या पाच वर्षांपासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना दर आठवड्यात डायलेसिस करावं लागतं. याशिवाय पत्नीला कधीकधी ऑक्सिजनची देखील गरज लागते. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमी ऑक्सिजन सिलेंडर असतो.
रुग्णसेवेचा ध्यास कसा घेतला?
या दरम्यान पास्कल यांच्या ओळखीतील एका शाळेच्या मुख्यध्यापिकांच्या पतीला ऑक्सिजनची गरज होती. पास्कल यांच्या पत्नीच्या प्रकृतीमुळे त्यांच्या घरी ऑक्सिजनचा सिलेंडर असतो, अशी माहिती मुख्यध्यापिकांना होती. त्यामुळे त्यांनी पास्कल यांना त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची चौकशी करुन पतीसाठी ऑक्सिजन सिलेंडर मागितला. पास्कल यांनी पत्नीच्या सल्ल्यानुसार त्यांना ऑक्सिजन सिलेंडर दिला. मुख्यध्यापिका महिलेची अवस्था बघून सल्धाना दाम्पत्याला खूप वाईट वाटलं. त्यामुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळावा यासाठी आपण मेहनत करायची, असा निर्धार या दाम्पत्याने केला.