भारतीयांचे आयुर्मान नऊ वर्षांनी
कमी होण्याची शक्यता
येत्या काळात वायू प्रदूषणामुळे सुमारे ४०% भारतीयांचे आयुर्मान नऊ वर्षांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) बुधवारी यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, “नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात राहणारे ४८ कोटी लोक मोठ्या प्रमाणात प्रदुषित भागांमध्ये राहतात.
ड्रग्स प्रकरणात अभिनेता अरमान कोहली याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबईतील न्यायालयाने अभिनेता अरमान कोहली याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अरमान कोहली याच्या मुंबईतील घरात ड्रग्ज जप्त केल्यानंतर NCB ने त्याला अटक केली होती.अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणातील धाडीचं सत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. अरमान कोहली याला मुंबई न्यायालयाने तब्बल 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) टीमने शनिवार सकाळी एका ड्रग पेडलरला अटक केली होती.
गेल्या महिन्यात सरकारी तिजोरीत जीएसटीच्या रुपात जमा झाले १.१२ लाख कोटी रुपये
मागील काही महिन्यांपासून जीएसटी संकलनाचा आकडा एक लाख कोटींच्या पार होत आहे. पण हाच संकलनाचा आकडा जून महिन्यात एक लाख कोटींच्या खाली आला होता. त्यानंतर जुलै महिन्यात पुन्हा एकदा सकारात्मक परिणाम दिसून आले आणि एक लाख कोटींच्या पार कलेक्शन जमा झाले होते.ऑगस्ट महिन्यातही संकलनाचा आकडा एक लाख कोटींच्या पार गेला आहे. सरकारी तिजोरीत गेल्या महिन्यात १.१२ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. ऑगस्ट २०२० या महिन्याच्या तुलनेत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
गोंधळाचा नवा अंक : काबुल एअरपोर्ट बंद, पाकिस्तान आणि इराण सीमेवर नागरिकांची झुंबड
अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत या विमानतळावर अमेरिकेचा ताबा होता. या विमानतळाचं व्यवस्थापनदेखील अमेरिकेकडून केलं जात होतं. मात्र आता अमेरिकेनं माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे विमानतळ तालिबानच्या ताब्यात आलं असून सध्या ते बंद ठेवण्यात आलं आहे.
हिटमॅन रोहित शर्माची झेप, पहिल्यांदाच टाकलं विराटला मागं!
टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेटमध्ये मोठी भरारी घेतली आहे. रोहितनं पहिल्यांदाच आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये टॉप 5 मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर त्यानं भारतीय कॅप्टन विराट कोहलीला मागं टाकलं आहे. कोहलीची एक क्रमांकानं घसरण झाली असून तो आता सहव्या नंबरवर आहे. या दोघांशिवाय एकही भारतीय बॅट्समन टॉप टेनमध्ये नाही.
आयसीसीच्या ताज्या रँकिंगनुसार इंग्लंडचा कॅप्टन जो रूट पहिल्या क्रमांकावर पोहचलाय. रूट 6 वर्षांनी टॉपवर पोहचला आहे. त्यानं न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन याला मागे टाकलं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये रूटनं 3 सेंच्युरीसह 507 रन केले आहेत. त्याची सरासरी 127 आहे. तर रोहित शर्मानं हेडिंग्लेमध्ये झालेल्या टेस्टमध्ये 19 आणि 59 रनची इनिंग खेळली होती.
२० टक्के पदे अनुकंपा
नियुक्तीने भरण्याच्या सूचना
राज्य शासनाच्या सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबावर ओढावलेल्या आर्थिक संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी, कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याच्या धोरणास गती देण्यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. विविध विभागांत, कार्यालयांत पदभरतीस मान्यता असणाऱ्या पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपा नियुक्तीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागवली
रखडलेल्या प्रकल्पांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायालये आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) निर्णयांमुळे अडकून पडलेल्या मोठ्या विकासकामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांसंदर्भात माहिती मागवली आहे. त्यांनी मंत्रीमंडळ सचिव राजेश गौबा यांना मंत्रालायांशी समन्वय साधून यासंदर्भातील माहिती गोळा करण्याचे आदेश दिलेत.
डेंग्यूच्या तापामुळे १० दिवसात
सुमारे ५३ लोकांचा मृत्यू
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यूच्या तापामुळे १० दिवसात सुमारे ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १८६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात सुमारे ४५ मुले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी
होऊन २४ लोक जखमी
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी – जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन २४ लोक जखमी झाले आहेत. मंगळवारी लसीकरण केंद्रावर एकच गर्दी झाल्याने दरवाजे उघडल्यानंतर लोकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही घटना घडली. आठ जणांना जलपाईगुडी जिल्हा रुग्णालयात आणि बिरपारा शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाकी लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
भारताला एकूण ५३ पदके
मिळण्याची अपेक्षा
जपानमधील टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, परंतु त्यानंतर याच शहरात झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी देशाची मान उंचावत अधिक चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये भारताला एकूण ५३ पदके मिळण्याची अपेक्षा आहे. कारण भारतीय खेळाडू पॅरालिम्पिक खेळांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. सुमारे ५४ खेळाडूंच्या भारतीय संघाने विविध स्पर्धांमध्ये आतापर्यंत एकूण १० पदके जिंकली आहेत.
तालिबानच्या ३५० दहशतवाद्यांना
कंठस्थान, नॉर्दन अलायन्सचा दावा
तालिबानच्या शेकडो सैनिकांनी मंगळवारी रात्री पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तालिबानने येथील एक पूल सुद्धा स्फोट करुन उडवला. नॉर्दन अलायन्सकडून लढणाऱ्यांची कोंडी करण्यासाठी तालिबानने हा पूल उडवल्याचं सांगण्यात येतं. मात्र दुसरीकडे नॉर्दन अलायन्सने तालिबानच्या ३५० दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्याचा दावा केलाय. तर ४० जणांना ताब्यात घेण्यात आल्याचंही ट्विटरवरुन सांगण्यात आलं आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात
दिवगंत अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून रक्तदाबासंबंधी काही समस्या जाणवत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
व्हॉटअॅपने बंद केली
३० लाखाहून अधिक अकॉउंट
भारतात जवळपास ५५ कोटी नागरिक व्हॉटअॅपचा वापर करतात. अन्य कंपन्यांप्रमाणे व्हॉटअॅप सोशल मीडिया अॅपही नव्या आयटी नियमाअंतर्गत येते. या कायद्यानुसार भारतातील सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला यूजर्स सेफ्टी रिपोर्ट सरकारला द्यावा लागतो. व्हॉटअॅपने दाखल केलेल्या रिपोर्टमध्ये जून-जुलै दरम्यान ३० लाखाहून अधिक अकॉउंटवर कारवाई केल्याचं समोर आलं आहे.
मंत्री अशोक चव्हाण यांच्या
घरावर अज्ञातांकडून दगडफेक
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. ही प्राथमिक माहिती असून अद्याप या घटनेमागील कारणाचा खुलासा होऊ शकलेला नाही.
अकरावी प्रवेशाच्या
शुल्कात 15 टक्के कपात
शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात 15 टक्के कपात करण्यात येणार आहे. 15 टक्के प्रवेश शुल्क सवलतीबाबत शिक्षण विभागाकडूनच निर्णय जाहीर करण्यात आलाय. या निर्णयानुसार अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्कात विद्यार्थ्यांना ही सूट मिळणार आहे. या प्रवेश शुल्कातील कपातीमुळे विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळालाय.
बाळूमामाचे वंशज मनोहर भोसले
यांच्या विरुद्ध गुन्हा
बाळू मामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांच्याविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक करत 40 लाख रुपये किमतीचा रो हाऊस घेतल्याचं या तक्रार अर्जात नमूद करण्यात आलंय. बारामतीतील महेश आटोळे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनोहर भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
SD social media
9850 60 3590