मुंबई- गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ चोळई येथे झालेल्या भीषण अपघातात तीन शाळकरी विद्यार्थिनींसह रिक्षाचालक असे चौघेजण जागीच ठार झाले. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील या विद्यार्थिनी रिक्षाने खेड येथे परीक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना हा अपघात घडला.
चोळई येथे वाळूने भरलेला डंपर त्यांच्या रिक्षावर उलटला. त्यात चिरडून चौघांचाही मृत्यू झाला. अमन उमर बहुर (रिक्षाचालक), हकिमा पोपेरे, असिया बहुर, नाजमिन करबेलकर अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. चौघांचेही मृतदेह बाहेर काढून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. आमदार भरत गोगावले यांनी रुग्णालयाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गोगावले यांनी केली आहे.