अमेरिकी काँग्रेसवर अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण राहणार की माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकनचे हे ठरवणाऱ्या मध्यावधी निवडणुकीसाठी अमेरिकेत आज, मंगळवारी मतदान होणार आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागा, सिनेटच्या ३५ जागा आणि ३६ राज्यांच्या गव्हर्नरपदासाठी निवडणुका होणार आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर म्हणजे अध्यक्षीय निवडणुकीनंतर दोन वर्षांनी मध्यावधी होतात. ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) सर्व ४३५ जागांसाठी निवडणूक होईल. ३५ सेनेटर्सही निवडले जातील. मध्यावधी निवडणुकीतून अध्यक्षांच्या दोन वर्षांतील कामगिरीवर मतपत्रिकेतून अंशत: सार्वमत व्यक्त होत असते.
अमेरिकेला सध्या तीव्र राजकीय ध्रुवीकरणाला तोंड द्यावे लागत आहे. ढासळती अर्थव्यवस्था, गर्भपाताचा हक्क आणि लोकशाहीच्या भवितव्याबाबत व्यापक चिंता व्यक्त केली जात असताना अमेरिकी संसदेची आगामी रचना कशी असेल, हे या निवडणुकीद्वारे निश्चित होईल.अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी प्रचार मोहिमेत मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी रिपब्लिकन पक्षावर, ‘निवडणुकीस नकार देणाऱ्यांनी मतपत्रिकांमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप केला, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी, वाढत्या डाव्या विचारसरणीला विरोध करण्याचे आवाहन मतदारांना केले होते.
याँकर्स येथील सारा लॉरेन्स महाविद्यालयामध्ये रविवारी संध्याकाळी बायडेन यांनी पाच राज्यांतील चार दिवसांच्या प्रचार मोहिमेची सांगता केली. सभेत त्यांनी डेमोक्रॅटिक गव्हर्नर कॅथी हॉचूल यांचा जोरदार प्रचार केला. त्यांचा सामना रिपब्लिकनच्या ली झेल्डिन यांच्याशी आहे. निवडणूक नाकारणाऱ्यांसाठी कोणत्याही निवडणुकीचे दोनच निकाल असतात- एक तर ते जिंकतात किंवा त्यांची फसवणूक केली गेलेली असते, अशी टीका बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर केली. ट्रम्प यांनी मियामीमध्ये समर्थकांसमोर बोलताना प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांना उद्देशून ‘‘लॉक हर अप!’’ असे उद्गार काढले. अमेरिकी संसदेच्या मुख्य सभागृहावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा रिपब्लिकनांचा प्रयत्न आहे. सेनेटच्या ३५ जागा मिळवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
अनेक रिपब्लिकन उमेदवारांनी गर्तेतील अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. कारण अमेरिकी नागरिक वाढत्या महागाईशी संघर्ष करीत आहेत. तर डेमोक्रॅट्सनी गर्भपाताच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही संस्था अबाधित राखण्याच्या मुद्दय़ांवर भर दिला आहे. अर्थव्यवस्था, गर्भपाताचा अधिकार, अमेरिकेत वास्तव्यासाठी होणारे स्थलांतर आणि लोकशाहीचे रक्षण हे मध्यावधीतील महत्त्वाचे मुद्दे राहिले आहेत.