या देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून, द्वेष, क्रोध आणि हिंसेचे वातावरण तयार केले जात आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी निघालेली ही भारत जोडो पदयात्रा आता कोणीही रोखू शकणार नाही, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन झाले. या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. तेलंगणातून यात्रेचे महाराष्ट्रात आगमन झाले. तेलंगणामधून एकता मशाल यात्रा सोबत होती. त्या मशाली महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या हातात सुपूर्द करून तसेच तेलंगण काँग्रेस अध्यक्षांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याकडे तिरंगा सुपूर्द केला व भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आगमन स्वागत झाल्याचा समारंभ पार पडला. यात्रेत सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांचीही उपस्थिती होती.
राहुल गांधी यांनी भाषणात, देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी, लहान व्यापारी यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशात जे हिंसेचे वातावरण तयार केले जात आहे, त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी ही यात्रा कन्याकुमारीपासून निघाली आहे. ती आता श्रीनगरलाच थांबेल आणि तिथे तिरंगा फडकवला जाईल, ही यात्रा आता मध्ये कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
देगलूरमध्ये जल्लोषात स्वागत
खासदार गांधी यांचे शहरात आगमन होत असताना बंजारा, आदिवासी, धनगर, वाघ्यामुरळी इ. समूहांनी पारंपरिक लोककला, नृत्य सादर करून भारतयात्रींचे स्वागत केले. देगलूर नगर परिषदेशेजारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास तसेच तेथे ठेवण्यात आलेल्या म. बसवेश्वर, म. जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या राष्ट्रपुरुषांना त्यांनी अभिवादन केले.
काँग्रेस, ‘भारत जोडो’च्या ट्विटर खात्यांवर तात्पुरती बंदी
‘भारत जोडो’ यात्रेसाठी बनवलेल्या चित्रफितीमध्ये ‘केजीएफ-चॅप्टर २’च्या पार्श्वसंगीताचा वापर करून स्वामित्व कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंगळूरुतील एका न्यायालयाने काँग्रेस तसेच भारत जोडो यात्रेच्या ट्विटर खात्यांवर बंदी आणण्याचे आदेश ट्विटरला दिले. ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रचार चित्रफितीमध्ये ‘केजीएफ’ चित्रपटातील संगीताचा बेकायदा वापर करण्यात आल्याचा आरोप करत एमआरटी म्युझिकने न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांची मागणी योग्य असल्याचा निर्वाळा देताना न्यायालयाने ध्वनिमुद्रणाचा बेकायदा वापर करण्यात आल्याचे सकृद्दर्शनी सिद्ध होते, असे स्पष्ट केले. अशा प्रकारच्या चौर्यकर्मामुळे याचिकाकर्त्यांचे मोठे नुकसान होत असून स्वामित्व कायद्याचेही उल्लंघन होत आहे, असे न्यायालयाने म्हटले. तसेच काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेची ट्विटर खाती बंद करण्याचे आदेश ट्विटरला दिले. या संदर्भात सर्व कायदेशीर पर्याय पडताळले जातील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.