भाजप नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचं निधन झालं आहे. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक होते. तसेच ते चंद्रपूरातील प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांचे काल संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास निधन झालं. नागपूर येथील किंग्जवे या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मुनगंटीवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर सच्चिदानंद मुनगंटीवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
“माझे सहकारी सुधीर मुनगंटीवार यांचे वडील, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. सुधीरभाऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांनी रा. स्व. संघ, लोकमान्य टिळक स्मारक मंडळ, चिन्मय मिशन अशा अनेक माध्यमातून सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. एक भक्कम आधारस्तंभ म्हणून ते आम्हा सर्वांच्या पाठिशी उभे असत.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.