बीड शहरात पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली. येथे ज्या 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यातील काही लोक शिक्षक असल्याचे आढळून आले. शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विद्यार्थ्यांना आदर्शाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनीच अशा प्रकारचे वर्तन केल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी जोर धरत होती. अखेर बीड जिल्हा परिषेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी पाच शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने चऱ्हाटा फाटा परिसरात एका जुगार अड्ड्यावर 29 डिसेंबर रोजी कारवाई करीत 50 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आरोपींमध्ये जिल्हा परिषदेचे पाच शिक्षक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात शिक्षक हरिदास जनार्दन घोगरे, भगवान आश्रुबा पवार, भास्कर विठ्ठल जायभाय, अशोक रामचंद्र सानप, बंडू किसन काळे यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकच जुगारी असतील तर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल, असा प्रश्न या प्रकरणानंतर उपस्थित जाला. तसेच या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी या शिक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.