भारताचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर सध्या चहूबाजूंनी टीका सुरु आहे. याचं कारण आहे त्याची फलंदाजी. मागच्या काही सामन्यात ऋषभच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्याडावात ऋषभ ज्या पद्धतीने बाद झाला, त्यामुळे टीकाकारांना त्याला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंबरोबर वाद झाल्यामुळे रागाच्या भरात चुकीचा फटका खेळून ऋषभ बाद झाला होता. “ऋषभला धावा करण्याची गरज आहे, नाही तर तो संघाबाहेर जाऊ शकतो” असं दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने म्हटलं आहे.
यष्टीपाठी राहून तो सतत बडबड करतोय यामुळे तो स्वत:च्या अडचणी वाढवून घेईल. ‘पंतने तोंडाऐवजी बॅटने बोलणं जास्त गरजेचं आहे’ असे मॉर्केलने सांगितलं. जोहान्सबर्गच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने 17 धावा केल्या तर दुसऱ्या डावात खातही उघडू शकला नाही. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात त्याने आठ धावा आणि दुसऱ्या डावात 34 धावा केल्या होत्या.
दुसऱ्या कसोटीत पंतची बॅट चालली नाही पण तोंड भरपूर चाललं. त्याने यष्टीपाठी राहून दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज वॅन डर डुसेंला भरपूर त्रास दिला. सतत यष्टीपाठून त्याची बडबड सुरु होती. मैदानावर स्लेजिग होते, पण मैदानावर पंत धावा करत नाहीय, याकडे मॉर्नी मॉर्केलने लक्ष वेधलं.
“माझ्या दृष्टीने ऋषभ पंत एक चांगला खेळाडू आहे. पण यावेळी मी त्याच्याजागी असतो, तर स्टंम्पच्या पाठून बोलण्याऐवजी बॅटने बोलणं जास्त पसंत केल असतं. त्याने कमी धावा केल्या तर त्याच्या अडचणी वाढू शकतात” असे मॉर्कलने म्हटलं आहे.