आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भावे यांनी केलेले फेसबुक लाईव्ह आणि त्यात त्यांनी वापरलेली भाषा वादग्रस्त ठरली होती. त्यावरून ठिकठिकाणी आंदोलन झाले. त्यामुळे शेवटी भावे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अखेर या साऱ्या प्रकरणाची दखल घेत आम आदमी पक्षाने भावेंची हकालपट्टी केली आहे. त्याचे आदेश आजच येऊन धडकल्याचे समजते.
फेसबुक लाईव्ह दरम्यान भावे यांनी महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना कामानिमित्त भेटण्यासाठी गेलो होतो, पण त्या वेळ देत नसल्याचा आरोप केला. बर इतका उल्लेख करूनही ते थांबले नाहीत. त्यांनी धनगर यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सोबत इतर कर्मचाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. मात्र, या लाईव्हच्या दरम्यान त्यांचे भान सुटले. त्यांनी बोलताना काम जमत नसेल, तर घरी बसून धुणी भांडी करावीत, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने झाले. शेवटी भावेंसह त्यांच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या. आता त्यांना पक्षातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांकडून अवाजवी बिल आकारल्याचा आरोप करत नाशिकच्या नामांकित वोकार्ड हॉस्पिटलमध्ये जितेंद्र भावे यांनी कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. भावे आणि त्यांच्या समर्थकांवर मुंबई नाका पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्याप्रकरणी कलम 188 आणि बेकायदेशीररित्या गर्दी जमवणे या कलमांखालीही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आंदोलनामुळेही ते चर्चेत राहिले होते.
राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नेते यांची भाषा गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरली आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नारायण राणे यांना तुरुंगात जावे लागले. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेली घोषणाबाजीही अशीच वादग्रस्त ठरली होती. तिथून पुढे घडलेले सारे रामायण आपण पाहिले. इतकेच कशाला राजकारण्यांची भाषा कशी असावी, असा वर्गही विधिमंडळात चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतरही अशी प्रकरणे होत आहेत. मात्र, काही का असेना, बोलताना शब्द जपून वापरलेले बरे असते. अन्यथा क्षणात होत्याचे नव्हते होते. हे तितकेच खरे.