श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीम निवडीमधून बीसीसीआयने भविष्यातले त्यांचे मनसुबे स्पष्ट केले आहेत. या सीरिजमधून बड्या खेळाडूंना बाहेर करण्यात आलं आहे. केएल राहुलचं उपकर्णधारपद गेलं आहे, तसंच शिखर धवनलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर ऋषभ पंतचं दोन्ही टीममध्ये सिलेक्शन झालं नाही. टी-20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर निवड समितीला बीसीसीआयने बरखास्त केलं आहे, यानंतर आता पुढचा नंबर कोच राहुल द्रविडचा असू शकतो.
नव्या निवड समितीची घोषणा होईपर्यंत चेतन शर्मा कार्यवाहक निवड समितीची भूमिका निभावत आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार राहुल द्रविडचे पंख कापले जाणार आहेत. बीसीसीआय टीमच्या कोचिंगला दोन भागांमध्ये विभागण्याच्या विचारात आहे. टी-20 फॉरमॅटसाठी परदेशी कोचला संधी द्यायची, तर वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला मुख्य कोच म्हणून कायम ठेवायचं, असा विचार बीसीसीआय करत आहे.
इनसाईड स्पोर्ट्सने एका बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. ‘सध्या तरी काही फायनल नाही, पण आम्ही अनेक पर्याय शोधत आहोत. राहुल द्रविड आमच्या प्लानमध्ये आहे, पण त्याच्यावर खूप जास्त वर्कलोड आहे. आमचा पूर्ण फोकस भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपवर आहे. सगळ्यांसाठी स्पष्ट संदेश आहे, आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा आहे. सध्या आमचा फोकस टी-20 नाही. बऱ्याच प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. कोणत्याही प्रकारचा निर्णय घ्यायच्या आधी क्रिकेट एडवायजरी कमिटी आणि निवड समितीलाही विचारात घेतलं जाईल. या सगळ्यासाठी बराच वेळ लागणार आहे,’ असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
क्रिकेट एडवायजरी कमिटी सध्या नव्या निवड समितीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबवत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये अर्ज करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर आता लवकरच नव्या निवड समितीची घोषणा होणार आहे.
भारताची टी-20 टीम
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
भारताची वनडे टीम
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग