डावखुऱ्या इशान किशनचा विक्रमी द्विशतकी झंझावात आणि विराट कोहलीने साकालेल्या शतकाच्या बळावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा २२७ धावांनी धुव्वा उडवला. मात्र, भारताने ही मालिका १-२ अशा फरकाने गमावली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ४०९ अशी धावसंख्या उभारली. किशनने सलामीला येताना १३१ चेंडूंत २४ चौकार व १० षटकारांची आतषबाजी करत २१० धावांची खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा किशन हा भारताचा चौथा फलंदाज ठरला. किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतकाचा (१२६ चेंडू) विक्रम आपल्या नावे केला. त्याला कोहलीची उत्तम साथ लाभली.
कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील जवळपास तीन वर्षांपासूनचा शतकाचा दुष्काळ संपवताना ९१ चेंडूंत ११ चौकार व दोन षटकारांसह ११३ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गडय़ासाठी २९० धावांची भागीदारी रचली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव १८२ धावांत आटोपला. भारताकडून शार्दूल ठाकूर (३/३०), अक्षर पटेल (२/२२) आणि उमरान मलिक (२/४३) यांनी भेदक मारा केला. तत्पूर्वी, भारताच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. शिखर धवनला (३) मेहदी हसनने लवकर बाद केले. यानंतर मात्र किशन-कोहली जोडीपुढे बांगलादेशचे गोलंदाज निष्प्रभ ठरले.
किशनने आक्रमक शैलीत फलंदाजी करताना ४९ चेंडूंत अर्धशतक, ८५ चेंडूंत शतक पूर्ण केले. मग त्याने धावांची गती अधिकच वाढवली. त्याने पुढील १०० धावा केवळ ४१ चेंडूंत केल्या. दुसरीकडे कोहलीने ८५ चेंडूत शतक झळकावले. हे दोघे बाद झाल्यावर मधली फळी अपयशी ठरली. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने (२७ चेंडूंत ३७) फटकेबाजी केल्याने भारताला ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला. ४१० धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात त्यांनी ठरावीक अंतराने गडी गमावले. अखेर बांगलादेशचा डाव १८२ धावांतच आटोपला.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ८ बाद ४०९ (इशान किशन २१०, विराट कोहली ११३; शाकिब अल हसन २/६८) विजयी वि. बांगलादेश : ३४ षटकांत सर्वबाद १८२ (शाकिब अल हसन ४३, लिटन दास २९; शार्दूल ठाकूर ३/३०, अक्षर पटेल २/२२)
२१० इशान किशन चेंडू १३१, चौकार २४, षटकार १०