भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्या आयुष्यात सुखद बदल घडवणाऱ्या काही Change makers किंबहुना क्रांतिकारकांची आठवण ठेवलीच पाहिजे.ते देशातील सर्वात मोठ्या दुग्धजन्य पदार्थ ब्रँड अमूल चे संस्थापक होते. अमूलने देशातील दुधाची टंचाई तर संपवलीच, पण यातून देशात दुधाचे इतके उत्पादन सुरू झाले की, गावेही समृद्ध झाली आणि देश दुधाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला.
1945-46 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी दुधासाठी सहकारी योजनेचा पाया घातला. त्यानंतर 1946 मध्ये सहकारी संस्था म्हणून नोंदणी झाली. कुरियन यांनी 1949 मध्ये अमूल डेअरी सुरू केली. त्यानंतर त्यांनी जे काही केलं त्याने इतिहास घडवला.
देशाला दूध उत्पादनात स्वयंपूर्ण केलं
देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी अन्नधान्याचा तुटवडा होता, तसेच दूध उत्पादनाची स्थितीही बिकट होती. कुरियन यांना ‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखले जाते. ज्यावेळी भारतात दुधाचा तुटवडा होता, त्यावेळी कुरियन यांच्या नेतृत्वाखाली भारताला दूध उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याचे काम सुरू झाले.
त्रिभुवन भाई पटेल यांच्यासोबत त्यांनी खेडा जिल्हा सहकारी संस्था सुरू केली. 1949 मध्ये त्यांनी गुजरातमधील दोन गावांना सभासद करून डेअरी सहकारी संघाची स्थापना केली. कुरियन हे म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करणारे जगातील पहिले व्यक्ती होते. पूर्वी गाईच्या दुधापासून पावडर बनवली जायची.
सुरुवातीला कंपनीची क्षमता 250 लिटर प्रतिदिन होती. सध्या अमूल कंपनीचे एकूण 7.64 लाख सदस्य आहेत. कंपनी दररोज 33 लाख लिटर दूध संकलन करते. कंपनीची प्रतिदिन 50 लाख लिटर हाताळणी क्षमता आहे. जगातील दूध उत्पादनात कंपनीचा वाटा 1.2 टक्के आहे.
असा विचार पहिल्यांदाच त्यांच्या मनात आला
1960 च्या दशकात भारतातील दुधाचे उत्पादन 20 दशलक्ष टन होते, जे डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कार्यकाळात 2011 पर्यंत वाढून 122 दशलक्ष टन झाले. म्हशीच्या दुधापासून पावडर बनवण्याची कल्पना देखील कुरियन यांचीच होती. यापूर्वी संपूर्ण जगात दुधाची पावडर फक्त गायीच्या दुधापासून बनवली जात होती. केवळ दुग्धोत्पादनच नाही तर इतर दुग्धजन्य पदार्थांसह खाद्यतेलाचे उत्पादनातही भरभराट आणण्यामागे कुरियन यांचा मोलाचा वाटा आहे.
ऑपरेशन फ्लड
अमूलच्या यशावर, तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अमूल मॉडेलचा इतर ठिकाणी प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय दूध विकास मंडळ (NDDB) ची स्थापना केली आणि त्यांना मंडळाचे अध्यक्ष करण्यात आले. NDDB ने 1970 मध्ये ‘ऑपरेशन फ्लड’ लाँच केले, ज्यामुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक बनला.
अशा प्रमुख कृषी क्रांती, ज्याने भारताचा जगभर दबदबा; काही तुम्हाला माहितही नसतील
कुरियन यांनी 1965 ते 1998 अशी 33 वर्षे NDDB चे अध्यक्ष म्हणून काम केले. ते 1973 ते 2006 पर्यंत गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे प्रमुख आणि 1979 ते 2006 पर्यंत ग्रामीण व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष होते.
उत्कृष्ट व्यवस्थापन क्षमता
कुरियन हे अभियंता होते आणि व्यवस्थापकही होते. कायरा दूध उत्पादक संघाशी संबंधित कुरियन यांची व्यवस्थापन क्षमता इतकी अप्रतिम होती की त्यांनी गावकऱ्यांना जोडून भारतातील सर्वात मोठा दुग्ध उद्योग निर्माण केला. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या अतुलनीय कौशल्याने आधुनिक भारतातील सहकार चळवळ आणि दुग्धव्यवसाय चळवळीला दिशा दिली, ज्यामुळे शेतकरी स्वावलंबी झाला आणि भारताचाही विकास झाला.
भारताचे मिल्कमॅन
भारताचे मिल्कमॅन बनलेल्या कुरियन यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत एक रंजक गोष्ट म्हणजे देशात ‘श्वेतक्रांती’ आणणारे आणि ‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती स्वतः दूध पीत नव्हती. ते म्हणायचे, मला दूध आवडत नाही म्हणून मी पीत नाही.
डेअरी इंजिनीअरिंगचे शिक्षण
कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1921 रोजी केरळमधील कोझिकोड येथे झाला. त्यांनी लॉयला कॉलेज, चेन्नई येथून 1940 मध्ये विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली आणि जी. सी. अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. TISCO, जमशेदपूर येथे काही काळ काम केल्यानंतर कुरियन यांना भारत सरकारने डेअरी अभियांत्रिकी शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली.
बंगळुरू येथील इम्पीरियल इन्स्टिट्यूट ऑफ अॕनिमल हसबंड्री अँड डेअरी येथे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर, कुरियन यूएसला गेले जेथे त्यांनी मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधून 1948 मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली, ज्यामध्ये डेअरी अभियांत्रिकी हा विषय होता. भारतात परतल्यावर, कुरियन यांना त्यांच्या बाँडची मुदत पूर्ण करण्यासाठी गुजरातमधील आनंद येथील सरकारी क्रीमरीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. डॉ. कुरियन यांचे 09 सप्टेंबर 2012 रोजी गुजरातमध्ये अल्पशा आजारानंतर निधन झाले.