सी.ए.जयेश दोशी यांचे प्रतिपादन
व्यवसाय असो की कुटुंब त्यासाठी रिस्क मॅनेजमेंट गरजेची असून ती जर नाही केली तर नुकसान अटळ आहे असे ज्येष्ठ चार्टर्ड अकौंटंट जयेश दोशी यांनी प्रतिपादन केले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे गणपती नगरातील डॉ. जी.डी.बेंडाळे वेलफेअर सेंटरच्या नथमल लुंकड सभागृहात आयोजित रिस्क मॅनेजमेंट इन बिझीनेस ॲन्ड फॅमिली या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष विपुल परेख व मानद सचिव रविंद्र वाणी यांची उपस्थिती होती.
वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ल्यानंतर रिस्क मॅनेजमेंट विषय आधिक चर्चेत आला असे सांगून त्यावेळची त्यांनी एक यशोगाथा सांगितली. विमा हा रिस्क मॅनेजमेंटचा एक भाग असून पॉलीसी विषयी सर्व माहिती वाचा. त्याची व एजंटची माहिती कुटुंबीयांना द्या. विदेशात उद्योगाचे मालक व व्यवस्थापन वेगवेगळे असण्याचे प्रमाण मोठे असून त्याचा सक्सेस रेट जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना दोशी यांनी व्यवसायात नवीन फंडे येत असून व्यावसायिकांना स्टार रेटींग सुरु झाल्याचे सांगितले. व्यावसायिकांनी नियोजन केले नसल्यास करापेक्षा व्याज आणि दंड अधिक भरावा लागतो. प्रत्येकाने कायदेशीवर जोखीम याचा विचार करावा. आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची सवय लावावी असे आवाहन केले.
कुटुंबातील व्यक्ती व्यवसायात एकत्र असल्यास नातं वेगळं आणि जबाबदारीत स्पष्टता असली पाहिजे. जेष्ठ व्यक्तींनी इच्छापत्र व हिस्से वाटणी वेळेवर केली पाहिजे असे ही जयेश दोशी यांनी सांगितले. सपने सच हुए या कष्टकऱ्यांच्या मुलांचे खरेदीचे स्वप्न साकारणाऱ्या यशस्वी कार्यक्रमाचे कल्पेश दोशी यांनी अनुभव कथन केले. परिचय महेंद्र रायसोनी यांनी करुन दिला.
प्राजक्त वैद्य यांनी कानळदा येथील विद्यार्थीनींनी साठीच्या संस्कृत पठण वर्गाची तर नीता जैन यांनी सहली विषयी माहिती दिली. कार्यक्रमास जिल्हा वकील संघाचे नूतन अध्यक्ष ॲड. केतन ढाके यांचयासह रोटरी सेंट्रलच्या सदस्यांची कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.