चीनमधून येणाऱ्यांना करोना चाचणी अनिवार्य; जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंडहून येणाऱ्यांनाही ‘आरटी-पीसीआर’ अहवाल सक्तीचा

चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर व थायलंड या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना करोनाशी संबंधित ‘आरटी-पीसीआर’ चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी येथे ही घोषणा केली. या देशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासले जाईल. करोनाची लागण झाल्याचे किंवा अथवा ताप असल्याचे आढळल्यास त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.

‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ (एनआयपीईआर) च्या दीक्षांत सोहळय़ास उपस्थित राहण्यासाठी मंडाविया आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी करोनाबाबत तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, प्रवाशांना आपली आरोग्याशी संबंधित स्थिती स्पष्ट करण्यासाठी ‘एअर सुविधा’ अर्ज भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाढत्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांना ‘आरटी-पीसीआर’ चाचण्यांचे अहवाल ‘एअर सुविधा’वर टाकावे लागतील. शिवाय भारतात आगमन झाल्यानंतर त्यांचे तापमान तपासले जाईल. यापैकी कुणी करोना बाधित आढळल्यास किंवा ताप असल्याचे दिसल्यास त्यांना विलगीकरणात राहावे लागेल. या देशांसह हाँगकाँग, युरोप, अमेरिका आणि ब्राझीलसारख्या ठिकाणी करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकार कोविड प्रतिबंधक पावले उचलत असल्याचे मंडाविया यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी करोनाप्रतिबंधासाठीच्या उपायांसाठी सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली असल्याचे सांगून मंडाविया म्हणाले, की वर्तमानपत्रातील जाहिरातींद्वारे लोकांना जागरूक केले जात आहे. संसदेत दिलेल्या निवेदनात नागरिकांनी स्वत:हून मुखपट्टीचा वापर सुरू करण्याचे आवाहन केले होते. तसेच सामाजिक अंतर राखणे आणि कोविड प्रतिबंधासाठी सुयोग्य वर्तन असणेही आवश्यक आहे. अशा उपायांमुळे नव्या ‘बीएफ-७’ उत्परिवर्तित विषाणूला प्रतिबंध करता येईल, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेसावध न राहता बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित यंत्रणांना गुरुवारी केले होते. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अधिक सावधगिरी बाळगण्याची सूचना त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नमुना चाचण्या सुरू
चीन, हाँगकाँग, थायलंड, जपान, दक्षिण कोरिया या देशांसह आंतरराष्ट्रीय प्रवाशांची नमुना चाचणी सुरू करण्यात आली आहे. नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानातील २ टक्के प्रवाशांची स्वैर पद्धतीने करोना चाचणी केली जाणार आहे. कोणत्या प्रवाशांची चाचणी होणार, याचा निर्णय विमान कंपनीने घ्यायचा आहे. मुंबईसह पुणे, दिल्ली, गोवा, हैदराबाद, बंगळूरु, चेन्नई, अहमदाबाद, इंदूर या विमानतळांवर चाचण्या सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी त्यामुळे गोंधळ झाल्याचे वृत्त नाही.

प्राणवायूच्या पुरवठय़ाकडे लक्ष
जगभरात करोनाची रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असताना आपापल्या ठिकाणी वैद्यकीय प्राणवायूच्या साठय़ाकडे लक्ष देण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. प्राणवायू निर्मिती प्रकल्प कार्यान्वित असणे, साठवणुकीची क्षमता वाढवणे आदी तपासण्याची सूचना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.