जोखीम सोसण्याची क्षमता कमी असलेल्या व्यक्तींसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना एक दीर्घकालीन गुंतवणुकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक समजली जाते. जी आकर्षक व्याज दर आणि गुंतविलेल्या रकमेवर निश्चित रिटर्न देते. पण तुम्हाला माहिती आहे का, पीपीएफ अकाउंट हे नेमकं कोणाला उघडता येतं?
पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही भारतातील दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना आहे. या योजनेत गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. पण पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही पात्रता निकष आहेत, ज्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासोबतच पीपीएफमध्ये कोण गुंतवणूक करू शकतो, आणि कोण गुंतवणूक करू शकत नाही, याचीही संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे.
अनिवासी भारतीयांसाठी आहे महत्त्वाचा नियम
अनिवासी भारतीय आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना पीपीएफ अकाउंट उघडता येत नाही. पण याला काही अपवाद आहेत. जर एखादा भारतीय रहिवासी, जो आता अनिवासी भारतीय झाला आहे, तो त्याच्या सुरू असलेल्या पीपीएफ अकाउंटचा कार्यकाळ संपेपर्यंतते चालू ठेवू शकतो. मात्र,ती व्यक्ती त्यांचे सुरू असलेलं पीपीएफ अकाउंट 15 वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत सुरू ठेवू शकते. 15 वर्षानंतर ते पुन्हा त्या अकाउंटची मुदत 5 वर्षांपर्यंत वाढवू शकत नाहीत.
पीपीएफ अकाउंट कोणाला उघडता येतं?
भारतात राहणारे भारतीय नागरिक पीपीएफ अकाउंट उघडू शकतात. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती पीपीएफमध्ये अकाउंट उघडण्यास पात्र आहेत. पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही. तसंच तुम्ही तुमच्या नावावर फक्त एकच पीपीएफ अकाउंट उघडू शकता. तुम्ही पीपीएफ अकाउंटसाठी सर्व पात्रता निकष पूर्ण केले, तरीही तुम्ही दुसरे पीपीएफ अकाउंट उघडू शकत नाही.
हा आहे महत्त्वाचा फायदा
पीपीएफ अकाउंट उघडल्यानंतर त्याचे विविध फायदे आहेत. पण तुम्हाला या अकाउंटचा एक सर्वांत महत्त्वाचा फायदा माहीत आहे का? पीपीएफ अकाउंट उघडल्यानंतर, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळू शकते. याशिवाय, पीपीएफ अंतर्गत मिळणारं व्याज आणि रिटर्न आयकराअंतर्गत करपात्र नाहीत.
दरम्यान, पीपीएफ अकाउंटला बचतीसह कर बचत करणारं महत्त्वाचं गुंतवणुकीचं साधन म्हणता येईल. तसंच हे अकाउंट पेन्शन निधी तयार करण्यास गुंतवणूकदारांना सक्षम करतं. त्यामुळेच कर वाचवण्यासाठी आणि खात्रीशीर रिटर्न मिळवण्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असणाऱ्यांसाठी पीपीएफ अकाउंट हा चांगला पर्याय आहे.