तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नियोजन करा : मुख्यमंत्री

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनांना दिल्या. आज ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.

राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केले. कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे, पण त्यासाठी पुरेश्या प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे.

आज ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत, नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे व यासाठी कोणतेही कारण चालणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्ह्णून आवश्यक त्या औषधांचा साठा आत्तापासून करून ठेवा. यासंदर्भात राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर्स मार्गदर्शन करीत आहेतच.

गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत आणखी लॉक डाऊन लावावा लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहावेत, अर्थचक्राला झालं बसू नये मात्र त्यासाठी आपापल्या भागातील उद्योगांशी संपर्क साधून कामगार व मजुरांची राहण्याची व्यवस्था त्या उद्योगाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या केलीआहे का ते पाहण्याचे व त्याचे नियोजन आत्तापासून करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.