2023 या वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी आज (10 जानेवारी) रोजी आहे. या दिवशी राज्यातील सर्व प्रमुख गणेश मंदिरामध्ये पहाटेपासून भक्तांची गर्दी आहे. नागपूरातील सीताबर्डीच्या टेकडीवर वसलेले प्राचीन गणेश टेकडी मंदिर म्हणजे तमाम नागपूरकरांचे आराध्य दैवत आहे. विदर्भातील अष्टविनायकपैकी हे प्रमुख स्थान आहे. वर्षभरात लाखो भाविक टेकडी गणेशाच्या दर्शनासाठी येतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज या बाप्पाचं दर्शन नियमित घेतात.
टेकडी गणपती मंदिर हे नाव का?
नागपूरचे आराध्य दैवत असलेले टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. सीताबर्डीच्या टेकडीवर हे गणपती मंदिर असल्यानं त्याला टेकडी गणपती मंदिर असं म्हंटलं जात. सीताबर्डी किल्ल्याच्या पूर्व उतारावर हे मंदिर आहे. नागपूरकर भोसल्यांच्या काळात या मंदिराचा लौकिक सर्वत्र रूढ झाला.
गणेशची स्वयंभू मूर्ती उजव्या सोंडेची असून दोन पाय, चार हात, डोके,सोंड पूर्वी स्पष्ट दिसत असत मात्र दर मंगळवारी लावण्यात येणाऱ्या शेंदराच्या पुटांमुळे मूर्ती अलीकडील काळात स्पष्ट दिसत नाही. नागपूरचा आद्य गणपती अशी टेकडी गणेशाची ओळख आहे. आपली मनोकामना पूर्ण करणारा, इच्छित फल देणारा, संकट निवारक असा हा बाप्पा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
काय आहे इतिहास ?
सन 1818 साली नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या मराठा- ब्रिटिश युद्धात आप्पा साहेबांचा पराभव झाला. त्यानंतर इंग्रजांनी सीताबर्डीच्या किल्ल्यावर ताबा मिळवला. याच टेकडीचा पूर्व भाग फोडून नागपूर रेल्वे स्टेशन निर्माण करण्यात आले. सुरुंग लावून हा भाग पडत असतानाच गणेशाची मूर्ती दृष्टीत पडली. या कारणामुळे या मुर्तीला स्वयंभू गणेश मूर्ती असे म्हटले जाते. काळाच्या ओघात मंदिरात अनेक स्थित्यंतरे आले भाविकांच्या अपार श्रद्धेतून मंदिराचा जिर्णोद्धार झाला आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे मंदिर आज भाविकांसाठी निर्माण झाले आहे.
गणेश टेकडी मंदिराला ‘ अ ‘ वर्गाचा दर्जासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. संकष्टी तसंच अंगारक चतुर्थीला मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. यंदाच्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 750 किलो रेवडी भाविकांना प्रसाद म्हणून वितरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रेवडी खास आग्र्यावरून मागविण्यात आली आहे. तीळ आणि गुळाचा वापर करून विशेष बनवण्यात आलेली ही रेवडी नागपुरात या दिवसाला भाविकांना प्रसाद म्हणून उपलब्ध होणार आहे.
दिग्गजांचं श्रद्धास्थान!
नागपुरकरांचं आराध्य दैवत असलेल्या या बाप्पाबद्दल अनेकांच्या मनात अपार श्रद्धा आहे. माजी पंतप्रधान नरसिंहराव पासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंतच्या अनेक दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. अगदी अलीकडील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नागपूरातील आपल्या भाषणाची सुरुवात टेकडीच्या गणेशाला वंदन करून केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही नागपुरात आल्यानंतर आवर्जून गणेशाचे दर्शन घेण्यासाठी इथं येतो, अशी माहिती गणेश टेकडी मंदिराचे सचिव श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.