पावसाळा सुरू झाला की मुंबईत सर्वसामान्यांचे जगणं मुश्कील होतं. अनेक ठिकाणी जुन्या इमारती कोसळून मोठे अपघात होतात. प्रशासन कितीही काळजी घेत असलं तरी दरवर्षी हे प्रकार पाहायला मिळतात. यात कित्येक लोकांचे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईतील शहरातील कुर्ला नाईक नगर भागात घडली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर येथे 4 मजली इमारत कोसळली आहे. यात अनेकजण दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासकीय सुत्रांच्या माहितीनुसार, आज रात्रीच्या सुमारास मुंबईतील कुर्ला नाईक नगर भागात एक 4 मजली इमारत कोसळून मोठा अपघात घडला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक दबले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमनदल आणि पोलीस पोहचले आहे. याठिकाणी स्थानिक लोकांच्या मजतीने बचावकार्य राबवले जात आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती मिळाली नाही. या घटनेचा व्हिडीओ प्रत्यक्षदर्शीनी चित्रित केला आहे. यात मोठ्या प्रमाणात ढिगारा पाहयला मिळत आहे.