महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटात असलेल्या शिवसेना आमदारांना दिलासा दिला आहे. 11 जुलैपर्यंत या आमदारांवर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यानंतर आता भाजप ऍक्शन मोडमध्ये आली आहे. 29 जून म्हणजेच बुधवारी भाजपच्या सगळ्या आमदारांनी मुंबईमध्ये उपस्थित राहावं, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. भाजप तसेच मित्र पक्षांच्या आमदारांनाही बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबईत यायला सांगण्यात आलं आहे. राज्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदारांना अलर्ट करण्यात येत आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजपने पहिल्यांदाच आपले पत्ते ओपन केले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली, या बैठकीनंतर मुनगंटीवार बाहेर आले आणि त्यांनी संवाद साधला.
‘राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंथन झालं. भाजपच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा झाली, आमची सध्या वेट ऍण्ड वॉचची भूमिका आहे. येणाऱ्या दिवसात जी परिस्थिती निर्माण होईल ती पाहून पुन्हा आमची बैठक होईल. या बैठकीत राज्यातल्या जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल,’ असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सरकार स्थापनेच्या प्रस्तावाबाबत अजूनही चर्चा झालेली नाही. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. हे बोलताना मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचं सांगितलं. दोन-तृतियांश आमदार असणाऱ्यांना बंडखोर कसं म्हणायचं, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तसंच एकनाथ शिंदे यांच्या गटाचं हिंदूत्व 24 कॅरेट सोन्यासारखं असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.