शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष आंदोलनात उतरणार : आ. अमरनाथ राजूरकर

नांदेड, माहूर : महाविकास आघाडीने येत्या सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधानपरिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात निवेदन करताना आ. राजूरकर म्हणाले की, गेल्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील बाळासाहेब थोरात, जयंत पाटील व एकनाथ शिंदे या तीनही पक्षाच्या प्रमुख मंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाकडून शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडून ठार मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र बंद’ जाहीर केला होता. आज सुद्धा खा. संजय राऊत, नवाब मलिक आणि सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांवरील दडपशाहीच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजीचा बंद नियोजित असल्याचे सांगितले.

या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडताना आ. अमरनाथ राजूरकर पुढे म्हणाले की, केंद्रातील सरकार शेतकऱ्यांवर इंग्रजांसारखी दडपशाही करते आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडून ठार मारण्याची ही अमानवीय, क्रूर मानसिकता यापूर्वी देशाने फक्त स्वातंत्र्यपूर्व काळातच पाहिली असेल. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांनी बंदला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

या आंदोलनामध्ये नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल तसेच पक्षाचे विविध सेल, माजी मंत्री डी.पी. सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे, आ. मोहन हंबर्डे, आ. माधवराव जवळगावकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर आदी नेते सहभागी होणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांना या आंदोलनातून वगळण्यात आल्याची माहिती आ. अमरनाथ राजूरकर यांनी दिली.

  • राजकिरण देशमुख, नांदेड, माहूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.