पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीच कराचीमध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे. कराची शहरातील बलदिया टाऊनच्या मावाच गोथ परिसरात एका ट्रकवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. यामध्ये चार मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
दहशतवादविरोधी विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजा उमर खट्टाब यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हा ग्रेनेड हल्ला असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचवेळी, पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रानुसार, वाहनावर पडण्यापूर्वीच ग्रेनेडचा स्फोट झाला. प्राथमिक तपासात हल्लेखोर मोटारसायकलवर असल्याचे उघड झाले आहे.
अतिरिक्त पोलीस शल्य चिकित्सक डॉ. कारर अब्बासी यांनी सांगितले की डॉ रुथ फाफा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 10 मृतदेह आणण्यात आले आहेत. पीडितांमध्ये सहा महिला आणि चार मुलांचा समावेश आहे.ते म्हणाले की या घटनेत जखमी झालेल्या इतर 10 लोकांना रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. ते म्हणाले की मृतांमध्ये चार मुले आहेत आणि त्यांचे वय 10 ते 12 वर्षे आहे.
दरम्यान अलीकडेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरानवाला जिल्ह्यात सिलेंडरचा स्फोट झाला. कॅंट पोलीस स्टेशनच्या शहा कोट परिसरातील गुजरानवाला येथे पॅसेंजर व्हॅनमध्ये सिलिंडर स्फोट होऊन किमान नऊ जण ठार तर सात जण जखमी झाले होते.
त्याचबरोबर पाकिस्तानच्या अस्वस्थ दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथील एका आलिशान हॉटेलजवळ वाहनाला लक्ष्य करून शक्तिशाली स्फोट करण्यात आला होता . यात किमान दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता तर आठ जण जखमी झाले होते .