देशातील दळणवळण आणि प्रवास वेगवान करण्यासाठी मोदींचा मास्टरप्लॕन;दोन महत्वाच्या योजनांची घोषणा

देशातील दळणवळण आणि प्रवास वेगवान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दोन नव्या योजनांची घोषणा केली. त्यानुसार येत्या 75 आठवड्यात रेल्वे विभागाकडून 75 वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येतील. या ट्रेन्स भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन संपूर्ण देश जोडतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

तर देशातील दळवळण वेगवान करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी गतीशक्ती योजनेची घोषणा केली. देशातील पायाभूत सुविधा या आणखी बळकट केल्या पाहिजेत. दळणवळणासाठी गतीशक्ती ही खास योजना असेल. जेणेकरून सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल.

या सगळ्यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

आगामी काळात देशाचा विकास करायचा असेल तर उत्पादन क्षमता आणि निर्यात वाढवावी लागेल. भारतातील उत्पादकांनी त्यांचे उत्पादन भारताची ओळख असल्याचं लक्षात ठेवावं. जगाच्या बाजारपेठेवर आपलं अधिराज्य असावं हे स्वप्न देशातील उत्पादकांनी पाहावं. सरकार त्यांच्यासोबत ठामपणे उभे असेल, असेही मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे

* देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना, स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांना नमन. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना देश आठवत आहे. या सर्वांना वंदन करतो.

* देशात पूर आणि भूस्खलनाच्या दुर्दैवी घटना घडल्यात. या घटनांमध्ये प्रभावित सर्वांसोबत केंद्र सरकार उभं आहे.

* उज्वला योजनेपासून आयुष्मानपर्यंत योजनांची ताकद सर्वसामान्यांना माहिती आहे. मात्र, इतक्यावरच थांबायचं नाहीये. 100 टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, सर्वांकडे बँक खाते असावेत, सर्वांकडे आयुष्मान कार्ड असावे, घरकुल योजनेतून प्रत्येक हक्काच्या व्यक्तीला घर द्यायचं आहे.

* देशातील प्रत्येकापर्यंत चांगल्या आरोग्याची व्यवस्था पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी आयुष्मान भारत योजनेत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहचवल्या जात आहेत, नागरिकांना स्वस्त औषधं उपलब्ध करुन दिले जात आहे. आता ब्लॉक स्तरावर आधुनिक रुग्णालयं उभे करण्यावर भर दिला जात आहे. पुढील काळात रुग्णालयांकडे स्वतःचे ऑक्सिजन प्लांट असतील.

* देशात भांडवलशाही आणि समाजवादाची खूप चर्चा होते. पण देशात सहकारवादाचीही गरज आहे. यामुळे देशातील जनता विकासाचा भाग बनावा म्हणून सहकार क्षेत्र महत्त्वाचं आहे. सहकार हे एक संस्कार, प्रेरणा आणि सोबत चालण्याची वृत्ती आहे. म्हणूनच स्वतंत्र सहकार मंत्रालय बनवण्यात आलं.

* वाढत्या लोकसंख्यामुळे कुटुंबात विभागणी होऊन गावांमध्ये शेतकऱ्यांकडील जमिनीचं प्रमाण कमी होतंय. हे मोठं आव्हान आहे. सध्या देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं आधी दिलं गेलं नाही. आत्ता या शेतकऱ्यांवर लक्ष दिलं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.