ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारपासून सुरू झालेला सामना चेतेश्वर पुजाराच्या कसोटी कारकीर्दीतील १००वा सामना आहे. त्यामुळे सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते विशेष ‘कसोटी कॅप’ देत पुजाराचा ‘बीसीसीआय’कडून गौरव करण्यात आला.
‘‘१०० कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तुझे स्वागत आहे. १००व्या कसोटीत मोठी शतकी खेळी करणारा तू पहिला भारतीय फलंदाज ठरशील अशी मला आशा आहे,’’ असे गावस्कर म्हणाले.
तसेच पुजारानेही आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘तुमच्यासारख्या दिग्गज खेळाडूंकडून मला प्रेरणा मिळाली. क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तेव्हापासून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न होते. मात्र, मी देशासाठी १०० कसोटी सामने खेळू शकेन असा कधी विचारही केला नव्हता,’’ असे पुजाराने नमूद केले. यावेळी भारतीय संघातील सहकाऱ्यांसह पुजाराचे वडील, पत्नी आणि मुलगीही मैदानावर उपस्थित होती. त्यांचेही पुजाराने आभार मानले.