डोनेत्स्क प्रांतातील मकिव्हका येथील रशियाच्या लष्करी तळावर युक्रेनच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात रशियाचे चारशे सैनिक ठार, तर अन्य तीनशे सैनिक जखमी झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
युक्रेनमधील दी कीव्ह इंडिपेन्डेंट या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या सैनिकांनी एका शालेय इमारतीत आश्रय घेतला होता. मकिव्हका येथील हल्ल्याबाबत युक्रेनच्या लष्कराने विशिष्ट अशी माहिती दिलेली नाही, पण युक्रेनच्या लष्करातर्फे दिल्या जाणाऱ्या दैनंदिन माहितीनुसार ३० डिसेंबर रोजी युक्रेनने केलेल्या हल्ल्यात रशियाचे ७६० सैनिक ठार झाले आहेत.
दरम्यान, रशियाच्या संरक्षण खात्याने म्हटले आहे की, युक्रेनचे केलेल्या हल्ल्यात आमचे ६३ सैनिक ठार झाले आहेत. या हल्ल्यात युक्रेनने अमेरिकेत तयार झालेल्या हिमार्स या प्रणालीचा वापर करून रॉकेटचा मारा केला, असे वृत्त तास या वृत्तसंस्थेने दिले आहे.रशियाच्या संरक्षण विभागातर्फे सांगण्यात आले की, मकिव्हका येथील रशियाच्या तात्पुरत्या तळावर सहा रॉकेट डागण्यात आली. यापैकी दोन रॉकेट रशियाच्या सैनिकांनी पाडली. अन्य चार रॉकेटमुळे ६४ सैनिकांचा मृत्यू झाला.