जळगाव-भुसावळ दरम्यान बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गोदावरी रुग्णालय जवळ एका कारने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण कार जळून भस्मसात झाली आहे. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
कारचे तापमान वाढल्याचे लक्षात येताच कार चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला लावून गाडीतील इतर प्रवाशांना खाली उतरवले. दरम्यान, त्याच वेळेस गाडीने अचानक पेट घेतला. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगावकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जळगाव अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली.
पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार पहायला मिळाला. दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. मात्र सुदैवाने चालकाने प्रवाशांना वेळीच बसमधून उतरवल्यामुळे या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
पीएमपीएमएलची बस पुण्याहून दापोडीला येत होती. त्यात वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत होते, मात्र प्रसंगावधान दाखवत चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर असताना आधी इंजिनमधून धूर येताना दिसला, त्यामुळे बस ड्रायव्हरने सर्व प्रवाशांना बसमधून तात्काळ खाली उतरवले. त्यानंतर बसने पेट घेतला. आग भडकल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.