राजकीय आणि आर्थिक संकटांनी ग्रासलेल्या श्रीलंकेत स्थैर्य आणण्यासाठी आपला पक्ष सरकारचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचा दावा श्रीलंकेतील प्रमुख विरोधी पक्ष समगी जन बालवेगयाने (एसजेबी) सोमवारी केला. संसदेत या निर्णयास कोणत्याही प्रकारे विरोध झाल्यास त्याकडे एक ‘विश्वासघातकी कृत्य’ म्हणून पाहिले जाईल, असा इशाराही या पक्षातर्फे देण्यात आला आहे.
हंगामी सर्वपक्षीय सरकार बनल्यानंतर विद्यमान मंत्रिमंडळ राजीनामा देईल व नव्या सरकारला सूत्रे प्रदान करेल, असे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आल्यानंतर एसजेबी पक्षाचे नेते सजिथ प्रेमदासा यांनी हा दावा केला आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. विक्रमसिंघेंनी नवे सरकार बनल्यानंतर पंतप्रधानपद सोडण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही नेत्यांनी पद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर रविवारी सर्वपक्षीय सरकार बनवण्याबाबत सर्व पक्षांच्या बैठकीत सहमती झाली. ‘इकॉनॉमी नेक्स्ट’ या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार एसजेबी पक्षाच्या समाजमाध्यमांवरील वाहिनीवर एका चित्रफितीत या पक्षाचे नेते प्रेमदासा यानी दावा केला, की श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानपदासह सरकार बनवण्याची आमच्या पक्षाची तयारी आहे. आम्ही या दोन्ही पदांचे नेतृत्व असलेले सरकार बनवू. याशिवाय अन्य कुठलाही पर्याय सध्या उपलब्ध नाही. याला कोणी विरोध केला किंवा संसदीय कामकाजात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याकडे एक विश्वासघातकी कृत्य म्हणून पाहिले जाईल. प्रेमदासा यांनी सांगितले, की आमच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी व नेतृत्वासाठी व अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जनतेच्या विरोधाचा उल्लेख करून ते म्हणाले, की या असंतोषामुळेच गोताबया यांना पदत्याग करावा लागत आहे. मातृभूमी व जनतेचा हा विजय आहे.