भारत आणि जगातील सर्वात वृद्ध वाघ ‘राजा’चा सोमवारी मृत्यू झाला. एसकेबी रेस्क्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजा याचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले. राजा वाघला पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजा हा देशातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या वाघांपैकी एक होता.
रॉयल बंगाल टायगर राजाचे वय 26 वर्षे 10 महिने 18 दिवस होते आणि तो 23 ऑगस्ट रोजी आपला 27 वा वाढदिवस साजरा करणार होता. पण वाढदिवसाच्या 40 दिवस आधी त्याने जगाचा निरोप घेतला. राजाच्या पुढील वाढदिवसाची तयारीही वनविभागाने केली होती.
एसकेबी रेस्क्यू सेंटरच्या म्हणण्यानुसार, सोमवारी पहाटे 3 वाजता राजा वाघाचा मृत्यू झाला. वृद्धापकाळामुळे राजा गेल्या काही दिवसांपासून अन्न खात नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राजाच्या मृत्यूनंतर अलीपूरद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र कुमार मीना, वन संचालनालयाचे अधिकारी दीपक एम आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रॉयल बंगाल टायगर राजाला श्रद्धांजली वाहिली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2006 मध्ये राजाला सुंदरबनमधून जखमी अवस्थेत पकडण्यात आले होते. नंतर त्यांना पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले. या ठिकाणी उपचार करण्यात आले. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुंदरबनमधील माताळा नदी ओलांडत असताना राजावर मगरीने हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र कुमार मीना यांनी सांगितले की, राजा वाघ गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याने काही दिवसांपूर्वी खाणेपिणेही बंद केले होते. राजा यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.