शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर अनेकवेळा टीका करताना दिसतात. यावेळी मात्र खैरे यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळे रखडले, असं खैरे यांनी म्हटलंय. ते औरंगाबाद जिल्ह्यातील सजापूर-करोडी रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळेच रखडले
चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. “औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळेच रखडले. रावसाहेब दानवे रस्त्याच्या ठेकेदाराला त्रास देत असल्याचं खुद्द नितीन गडकरी यांनी मला सांगितलं. भाजप खासदरच रस्त्याचा ठेकेदार होता. तरीही रावसाहेब दानवे यांनी त्रास दिला,” असा दावा खैरे यांनी केला आहे.
भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर मी मोठा नेता असल्याचं वक्तव्य केलं होतं. कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं ते म्हणाले होते. मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला होता.