राज्य सरकारांनी लॉकडाउन करण्यावर
गांभीर्याने विचार करावा : सर्वोच्च न्यायालय
कोरोना महामारीच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडाउन करण्यावर गांभीर्याने विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सामुहिक सोहळे आणि सुपर स्प्रेडर कार्यक्रमांवर प्रतिबंध लावावेत, असे आदेशही न्यायालयाने सरकारांना दिले आहेत. लॉकडाउन लावलाच तर हातावर पोट असलेल्या वंचितांसाठी विशेष तरतुदी कराव्यात, असा सल्लाही न्यायालयाने दिला आहे. देशात महामारीमुळे ऑक्सिजनचे संकट गंभीर झाले आहे. ऑक्सिजनची उपलब्धता, लशींची उपलब्धता आणि त्यांच्या किमती, आवश्यक औषधे योग्य किमतींमध्ये उपलब्ध करून देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे, नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
रिमझिम इस्पात दररोज अडीच हजार
ऑक्सिजन सिलिंडर देतेय मोफत
उत्तर प्रदेशातीलच नव्हे तर, आजूबाजूच्या राज्यांनासुद्धा रिमझिम इस्पातच्या ऑक्सिजन प्लांटमधून दररोज जवळपास अडीच हजारांहून अधिक गॅस सिलिंडर रुग्णालयांना मोफत पुरवले जात आहेत. मानवतेची सेवा करणे याहून अधिक काहीच असू शकत नाही, असे कंपनीचे मालक आणि कानपूर येथील रहिवासी योगेश अग्रवाल यांचे म्हणणे आहे. भलेही दररोज कोट्यवधी रुपयांचे स्टिलचे उत्पादन होत नसले तरी, माणसाचे प्राण वाचविण्याची किंमत कोट्यवधी रुपयांपेक्षाही अधिक आहे, असे त्यांनी सांगितले.
तर माझा शिरच्छेद केला
जाईल : अदर पुनावाला
भारतामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला यांनी ‘द टाईम्स’ या युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातील सध्याच्या स्थितीसाठी कोण जबाबदार आहे यासंदर्भात आपण भाष्य करु शकत नाही असं म्हटलं आहे. काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींकडून लसींची मागणी करणारे धमकावणारे फोन आपल्याला येत असल्याचा खुलासा करतानाच पुनावाला यांनी सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचं नाव घेतलं किंवा उत्तर दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती व्यक्त केली.
पूनावाला यांना सुरक्षा का मागावीशी
वाटली हा प्रश्न गंभीर
अदर पूनावाला यांनी कोणाचंही नाव घेतलं नसून मुख्यमंत्र्यांपासून ते उद्योजकांपर्यंत अनेकांचे धमकीचे फोन येत असल्याचा मुलाखतीत केला आहे. दरम्यान भाजपा नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणावरुन संताप व्यक्त करत ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावं असा इशारा दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.“पूनावाला यांना आताच्या काळात सुरक्षा का मागावीशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. दिशादर्शन जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्र सरकारने सुरक्षा पुरवत आपलं काम चोख केलं आहे,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. करोनाच्या संकटात आज आम्हाला राजकारण करायचं नाही. लोकांची सेवा करणं भाजपाने धोरण आखलं आहे असंही ते म्हणाले.
अदर पूनावाला यांच्यावर केंद्रसरकार
नजर ठेवते आहे का : नाना पटोले
सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारला घेरले आहे. पूनावाला यांनी कोणतीही सुरक्षा मागितलेली नसताना त्यांना केंद्राने सुरक्षा दिली. त्यामागे काय दडलं आहे? असा सवाल करतानाच केंद्राने पुरवलेले सुरक्षा रक्षक अदर पूनावाला यांची रेकी करत आहेत काय?, असा गंभीर सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या
सर्वात प्रभावशाली नेत्या
पाश्चम बंगालमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला मोठ्या अंतराने पराभवाची धूळ चारून ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या सर्वात प्रभावशाली नेत्या म्हणून राष्ट्रीयस्तरावर समोर आल्या आहेत. परंतु विरोधी पक्षांची मोट बांधून त्याचे नेतृत्व करण्याची त्यांची वाट बिकट असल् चित्र आहे. निवडणुकांमध्ये सलग पराभावाचा सामना करणारी आणि भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याच्या गोष्टी करणारी काँग्रेस ममता दीदींच्या वाटेत खोडा टाकण्याची एकही संधी सोडणार नाही. तसेच काही प्रादेशिक पक्ष ममता दीदींचे नेतृत्व स्वीकारण्यास अनुकूल नसतील. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत.
पश्चिम बंगालमध्ये निकाल लागताच
हिंसाचार ४ कार्यकर्त्यांचा मृत्यू
प्रचारादरम्यान हिंसाचाराचं गालबोट लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल लागताच हिंसाचाराचा उद्रेक होताना दिसत आहे. निकाला लागल्यापासून राज्यातील विविध ठिकाणी हिंसक घटना घडल्या असून, यात आतापर्यंत ४ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. नंदीग्राममध्येही हिंसक घटना घडली असून, नंदीग्राम भाजपाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
नीट परीक्षा ४ महिने पुढे
ढकलण्याचा निर्णय
नीट(NEET-PG) ही परीक्षा ४ महिने पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवी तारीख परीक्षेच्या एक महिना अगोदर जाहीर केली जाईल.त्याचबरोबर इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांनाही आता करोनारुग्णांची सेवा बजावण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे इंटर्न्स त्यांच्या वरिष्ठांसोबत राहून करोना रुग्णांवर उपचार करतील. फोनच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तसंच सौम्य लक्षणं असलेल्या करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी या डॉक्टर्सची मदत घेतली जाणार आहे. यामुळे आत्ता सेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवरचा कामाचा ताण कमी व्हायला मदत होणार आहे.
देशभरामध्ये पुन्हा
लॉकडाऊनची शक्यता
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, अनेक तज्ज्ञ, टास्क फोर्स आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर पंतप्रधान मोदी आपल्या निर्णयाचा फेरविचार करु शकतात, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
राज्यात काही ठिकाणी
गारपीट पावसाचा अंदाज
राज्यातील काही भागांमध्ये आगामी दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांवर रक्षणासाठी ताडपत्री अथवा प्लॅस्टिकचं आवरण टाकावे, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. कालच पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले होते. तत्पूर्वी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पाऊस झाला होता.
कोलकात्ता नाइट रायडर्स विरुद्ध
रॉयल चॅलेंजर्स सामना पुढे ढकलला
आज आयपीएलच्या साखळीत होणारा कोलकात्ता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा सामना पुढे ढकलण्यात आला असून याबाबतची सविस्तर माहिती लवकरच बीसीसीआय तर्फे जाहीर करण्यात येईल. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर्स हे दोन खेळाडू कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
SD social media
9850 60 3590