आज दि.२७ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळला साप, अनेक मुलांची तब्येत बिघडली

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जात असतं. पण, बिहारमध्ये एका शाळेत मध्यान्ह भोजनामध्ये चक्क साप दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बिहारमधील अररिया येथील फारबिसगंज येथील अमौना स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात साप आढळून आला. या प्रकारामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर आतापर्यंत 12 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना फारबिसगंज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे. एका सामाजिक संस्थेकडून हे मध्यान्ह भोजन तयार करण्यात आले होते.

‘द केरळ स्टोरी’ च्या दिग्दर्शकाची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

 ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा मागच्या काही दिवसांपासून कोणत्या कोणत्या कारणामुळं चर्चेत आहे. आता या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची अचानक तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये सुदीप्तो सेन आजारी पडण्यामागचे कारणही समोर आले आहे.सुदीप्तो सेन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप व्यग्र असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ते आजारी पडले असल्याचे सांगतिले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तणाव आणि सततच्या प्रवासामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या बातमीने चित्रपटाशी संबंधित लोक आणि चाहते अस्वस्थ झाले आहेत.

महाविकास आघाडीची पुण्यात वज्रमूठ सभेची तयारी सुरू

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुण्यात वज्रमूठ सभा आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवरील ‘मविआ’ पदाधिकाऱ्यांकडून नियोजनाच्या दृष्टीने बैठका सत्र सुरू झाले आहे. वज्रमूठ सभा कधी होणार याचा निर्णय महाविकास आघाडीचे राज्यातील नेते घेणार असले तरी जागा निश्चिती करण्याची सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

राज्य काँग्रेससाठी आता नवा प्रभारी नेमावा लागणार

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचा कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने राज्य काँग्रेससाठी आता नवीन प्रभारी नेमावा लागणार आहे. एच. के. पाटील यांनी यापूर्वी सहकार खाते भूषविले होते. सिद्धरामय्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात पाटील यांचा समावेश करण्यात आला. काँग्रेसमध्ये शक्यतो एक व्यक्ती, एक पदाचे सूत्र अंमलात आणले जाते. कर्नाटक काँग्रेसमध्ये पाटील हे ज्येष्ठ नेते असले तरी काँग्रेसच्या राष्ट्रीय संघटनेत तसे ते अनुनभवी होते.काँग्रेसमध्ये महाराष्ट्राची जबाबदारी आतापर्यंत केंद्रातील ज्येष्ठ नेत्याकडे सोपविली जात असे. त्यात जी. के. मूपनार, माधवराव शिंदे, वायलर रवी, मार्गारेट अल्वा, मल्लीकार्जुन खरगे आदींचा समावेश होता. या तुलनेत एच. के. पाटील नवखे होते. तरीही त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 

यंदा मान्सून चांगला, पण…; भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला दीर्घकालीन अंदाज

भारतीय हवामान खात्याने नुकताच मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. देशात नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य राहणार असून ९४ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, तो उशिराने दाखल होणार आहे.भारतातील शेती ही पावसावर अवलंबून आहे आणि या अंदाजाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचादेखील प्रभाव राहील अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली होती. एल निनो म्हणजे कमी पाऊस असे असले तरीही एल निनो असताना अनेकदा चांगला पाऊसही झाला आहे. मान्सून सध्या बंगालच्या उपसागराकडे सरकत असून केरळमध्ये तो चार जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. देशातील काही भागांत सामान्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर काही भागांत सामान्यापेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

कर्नाटकात आज मंत्रिमंडळाचा विस्तार

कर्नाटकचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी शुक्रवारी दिल्लीहून बंगळुरूत परतल्यावर पत्रकारांना  सांगितले, की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी दुपारी होईल आणि संध्याकाळपर्यंत खात्यांचे वाटप केले जाईल. चार किंवा पाच मंत्रिपदे वगळता उर्वरित पदांसाठी शनिवारीच निवड होईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी स्वतंत्र भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी विचारविनिमय करण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत. त्यांनी   कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे संघटनात्मक सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेऊन विचारविनिमय केला. कर्नाटक मंत्रिमंडळात आणखी  २० मंत्र्यांचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करण्याबाबत मोठं विधान

धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी पाकिस्तानबाबत मोठं विधान केलं आहे. काही लोक देव नसतो, दिव्य शक्ती नसते, हे सर्व ढोंगी आहेत, असं म्हणतात असा आरोप धीरेंद्र शास्त्रींनी केला. तसेच ज्यांना असं वाटतं त्यांनी बागेश्वर बालाजीच्या दरबारात यावं, असं आव्हान दिलं. ते शनिवारी (२७ मे) गुजरातमध्ये आयोजित बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात बोलत होते.धीरेंद्र शास्त्री महाराज म्हणाले, “बागेश्वर धाममधील माझ्या वेड्यांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या दिवशी गुजरातचे लोक अशाप्रकारे संघटित होतील त्या दिवशी भारतच काय, मी पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करेन. इथले लोक म्हणतात की हिंदू राष्ट्र कसं शक्य आहे. हिंदू राष्ट्र होतं, आहे आणि यापुढेही राहील. जे म्हणतात देव नसतो, दिव्य शक्ती नसते, हे सर्व ढोंगी आहेत, त्यांनी बागेश्वर बालाजीच्या दरबारात यावं.

करोना काळात किंम जोंग उनने देशाच्या सीमेवर उभारली शेकडो किलोटमीरची भिंत

उत्तर कोरियाने त्यांचे शेजारी देश चीन आणि रशियाबरोबरच्या सीमा सील केल्या आहेत. २०२०-२१ मध्ये जेव्हा कोरोनामुळे संपूर्ण जग एकप्रकारे बंद पडलं होतं. सगळीकडे लॉकडाऊन होता, लोक घरातून बाहेर पडू शकत नव्हते. तेव्हा उत्तर कोरियात मात्र वेगळ्याच हालचाली सुरू होत्या. या काळात उत्तर कोरियाने त्यांच्या चीन आणि रशियालगतच्या सीमेवर शेकडो किलोमीटरची नवीन भिंत बांधली आहे. ही संरक्षक भिंत बांधत असताना भिंतीलगत ठराविक अंतरावर चौक्याही बांधल्या आहेत. तसेच संरक्षण यंत्रणा बसवली आहे.उत्तर कोरियाच्या सीमेवरील भिंत दर्शवणारे काही फोटो रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहेत. या देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या नागरिकांचा रस्ता या भिंतींमुळे आता बंद झाला आहे. उत्तर कोरियातील लोकांना देशाच्या उत्तर सीमेवरून बाहेर पळून जाता येत होतं. तसेच तिथून माहिती मिळवणं, व्यापार करता येत होता. परंतु या भिंतीमुळे आता हे सगळं बंद होणार आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.