नव्या संसदेत ‘अखंड भारत’चा नकाशा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मोठ्या धामधूमीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन झालं. उद्घाटनापूर्वीच हा कार्यक्रम वादात सापडला होता. आता उद्घाटनानंतरही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन संसद भवनातील भित्तिचित्रांवर प्राचीन भारताचा प्रभाव दिसून येत आहे. यातील काही भित्तीचित्रे रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यात ‘अखंड भारत’चा संकल्प दिसत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ‘अखंड भारत’चे वर्णन ‘सांस्कृतिक संकल्पना’ असे करते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. संसद भवनातील भित्तिचित्रे भूतकाळातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे दर्शवित आहेत. सध्याच्या पाकिस्तानमधील तक्षशिला येथे प्राचीन भारताचा प्रभाव दिसून येत आहे.भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कर्नाटक युनिटने प्राचीन भारत, चाणक्य, सरदार वल्लभभाई पटेल आणि बी.आर. आंबेडकरांव्यतिरिक्त, देशातील सांस्कृतिक विविधतेच्या भित्तीचित्रांसह कलाकृतींची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
‘शिंदेंना बोललं तर हेच भू भू करतं’, अजित पवारांची शिवसेना नेत्यावर विखारी टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर विखारी टीका केली आहे. कराड चिपळूण रस्त्याचं किती वर्ष काम चालू आहे, काय करतोय इथला आमदार? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
तसंच सारखं जरा काही झालं की टीव्हीच्या पुढे सगळा मक्ता यालाच दिलाय. शिंदे साहेबांच्यावर बोललं तरी हीच भू..भु…भू. कुणावरही झालं की ह्यांनीच बोलायचं, माणसाने सत्ता आली की सत्तेची नशा चढू द्यायची नसते, अशी टीका अजित पवारांनी शंभुराज देसाई यांच्यावर केली आहे.
घरात 3 लाईट अन् एक फॅन, बिल पाठवलं 4 लाख; महावितरणचा व्यवसायिकाला शॉक
चुकीचं वीजबिल पाठवणं, मीटरचं रिडींग चुकीचं घेणं, मनमानी पद्धतीनं बिलाची वसुली करणं याचा फटका आतापर्यंत अनेकांना बसला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आता मनामाडमधून समोर आला आहे. बांगड्या विकणाऱ्या एका सामान्य व्यवसायिकाला महावितरणाकडून चक्क चार लाखांचं बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहून या व्यवसायिकाला धक्का बसला आहे. दर महिन्याला आपण वीजबिल भरणा करत आहोत, तरीही मला एवढ्या मोठ्या रकमेचं बिल आलं आहे. मी यासंदर्भात तक्रार केली मात्र कोणीही तक्रारीची दखल घेतली नाही. उलट बिल न भरल्यानं मीटर काढून नेल्याचा दावा या व्यक्तींनं केला आहे. या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सरदार पटेल रोडवर राहणारे इकबाल शेख यांची शिवाजी चौकात बांगड्या विकण्याची छोटीशी टपरी आहे. या टपरीवरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या घरात केवळ तीन लाईट आणि एक पंखा एवढीच इलेक्ट्रिकची उपकरणं आहेत. मात्र त्यांना महावितरणकडून तब्बल 4 लाख 5 हजार 490 रुपयांचं बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहून त्यांना धक्काच बसला.
बहीण-भावाची जवळीक वाढली, भाजपमध्ये जाणार का? धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
माजी मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता खुद्द धनंजय मुंडे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासाठी दिल्ली आणखी खूप दूर आहे. लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दरम्यान सध्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे बहिण-भावामधील जवळीक वाढत आहे. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का? या प्रश्नावर देखील मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.माझ्यासाठी दिल्ली आणखी खूप दूर आहे. लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. मी राज्यातच काम करण्यास इच्छुक असून माझ्यासाठी दिल्ली अजून वीस-पंचवीस वर्ष दूर आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी लोकसभेच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
गरज पडल्यास संपूर्ण 48 जागा स्वबळावर लढणार; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने आघाडीत खळबळ
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ज्याची जिथं जास्त ताकद ती जागा तो लढवणार, असं वक्तव्य केलं होतं. अशातच आता गरज पडल्यास काँग्रेस महाराष्ट्रातल्या संपूर्ण 48 जागा स्वबळावर लढणार असल्याचा दावा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केला आहे.डॉ. उल्हास पाटील म्हणाले, प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वतःच्या अस्तित्वासाठी संपूर्ण मतदारसंघात तयारी करत असतो. त्यानुसार आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपली काय ताकद आहे, याचा आढावा घेतोय. जशी वेळ येईल त्यावेळेला तसं पुढे जाण्याची तयारीही आम्ही ठेवली आहे, असंही डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत भाजपला हरवायचं हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. शिवाय रावेर लोकसभेतला मतदार हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेससोबत राहिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळेल यात शंका नाही, हे राष्ट्रवादीला देखील माहिती असल्याचं डॉ. पाटील म्हणाले.
नाशिक: आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी २२७० कोटींचा पुरवणी निधी मंजूर
राष्ट्रीय आरोग्य अभियान मिशन कार्यक्रम अंमलबजावणी योजनेंतर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी २०२२-२३ वर्षाकरिता ६५२ कोटी तर, २०२३-२४ वर्षासाठी १६१८ कोटी, याप्रमाणे एकूण २२७० कोटींच्या पुरवणी निधीला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून राज्यातील आरोग्य सेवा बळकट होणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विशेष पुरवणी निधीची मागणी केली होती.
पावसाचा कहर काही थांबेना, अवकाळी की मान्सूनपूर्व..?
राज्यात पुढील आठवड्यात मान्सूनच्या आगमनाची नांदी मिळाली, पण पाऊस मात्र अजूनही थांबायचे नाव घेत नाही. येणारा पाऊस अवकाळी की मान्सूनपूर्व याबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे.मार्च महिन्यापासून राज्यात विशेषतः विदर्भात अवकाळी पावसाने जोर धरला. यामुळे शेतपिकाचे, बागाईतदारांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर १५ दिवस उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र होरपळला असताना आता हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये २९ आणि ३० मे रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. २७ मे पासूनच हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली.
देशाला मिळाले सर्वांत महागडे नाणे, मोदींच्या हस्ते अनावरण झालेल्या ७५ रुपयांच्या नाण्याचे वैशिष्ट्य काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनादिनी टपाल तिकिट आणि ७५ रुपयांच्या नाण्याचे आज अनावरण केले. आजचा दिवस कायम लक्षात राहावा याकरता हे अनावरण करण्यात आले आहे.नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमात लोकसभेत सर्व सदस्य स्थानापन्न झाले. यावेळी लोकसभेतील काही सदस्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संबोधित करत या नव्या संसद भवनाचे महत्त्व विषद केले. त्याआधी आजचा हा दिवस सर्वांच्या कायम संस्मरणात राहावा याकरता टपाल तिकिट आणि ७५ रुपयांच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून जारी झालेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, या नाण्याचे वजन ३४.६५ ते ३५.३५ ग्रॅमचे आहे. या नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी अशोक स्तंभाचा सिंह आहे. तर, डावीकडे देवनागरी लिपित भारत लिहिलेले आहे. तर, उजवीकडे India असं इंग्रजीत लिहिलेले आहे. तसंच, अशोक स्तंभाच्या सिंहाखाली रुपयाचे चिन्ह असून 75 असं अंकात लिहिलेले आहे. या नाण्याचा व्यास ४४ मिमी असून हे नाणे चार धातुंनी तयार केलेले आहे. यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसदेचे चित्र असेल तर वरच्या बाजूला देवनागरीत संसक संकुल तर खालच्या बाजूला इंग्रजीत संसद संकुल असे लिहिलेले आहे. याबरोबरच नाण्याच्या खालच्या बाजूला २०२३ हे वर्ष छापलेले दिसेल.
पालघरमध्ये १५ मिनिटांच्या अंतरांनी भूकंपाचे दोन सौम्य धक्के
पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी ( २७ मे ) संध्याकाळच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले. हे धक्के सौम्य असल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण परसलं होतं. भूकपांच्या धक्कांनी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
SD Social Media
9850 60 3590