आज दि.२९ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

2026 ला देशात सीमांकन होणार, महाराष्ट्रातून लोकसभेच्या इतक्या जागा वाढणार!

नवीन संसद भवन उद्घाटनानंतर आता देशात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2026 मध्ये देशात सीमांकन होणार आहे, त्यामुळे देशातील लोकसभेच्या सध्याच्या 543 जागा वाढून 1 हजार 210 होणार असल्याचं सांगण्यात येतं आहे.सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता नव्या सीमांकनानंतर लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढेल, त्यामुळे सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असून त्यांची संख्या 82 वर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनीही नवीन सीमांकनाबाबत उल्लेख केला आहे. सध्या देशाची लोकसंख्या ही 142 कोटींवर पोहोचल्याचा अंदाज असून 10 लाख लोकसंख्येमागे एक लोकसभेची जागा असा फॉर्म्युला ठरल्यास लोकसंख्येप्रमाणे देशात 1 हजार 210 मतदारसंघ होतील, पण नव्या संसद भवनामध्ये 888 खासदार बसू शकतील एवढीच व्यवस्था आहे, त्यामुळे 888 मतदारसंघ तयार करायचे झाल्यास, 16 लाख लोकसंख्येमाग एक मतदारसंघाचं समीकरण ठेवावं लागेल.

WTC Final ची तयारी जोरात, पाऊस पडला तर असा लागणार निकाल!

आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची तयारी सुरू झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून इंग्लंडच्या ओव्हलमध्ये अंतिम सामन्याला सुरूवात होणार आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे तर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीमनी त्यांच्या 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. याचसोबत आयसीसीनेही फायनलसाठीचे अंपायर जाहीर केले आहेत.भारतीय टीमचे बरेच खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. कर्णधार रोहित शर्मा नुकताच इंग्लंडमध्ये आला आहे, त्याआधी विराट कोहली इकडे दाखल झाला आहे. इंग्लंडचे रिचर्ड एलिंगवर्थ आणि न्यूझीलंडचे क्रिस गाफने फायनलमध्ये अंपायर असतील. फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला तर 12 जून हा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.

पुण्यातलं भारी रताळं

रताळं, सामान्यपणे उपवासाला खाल्ली जातात. तुम्हीही रताळं खाल्लं असेल. अगदी छोटी छोटी आणि मोठी रताळीही मिळतात. पण मोठं म्हणजे फार फार तर किती मोठं रताळं तुम्ही पाहिलं असेल. अर्धा किलो, पाव किलो. पण पुण्यात असं रताळं आहे, ज्याचं वजन इतकं आहे की तुम्ही विचारही केला नसेल. रताळ्याच्या वजनाचा आकडा वाचूनच तुम्हाला चक्कर येईल.जुन्नर तालुक्यातील माळवाडी नेतवड येथील शेतकरी पंढरीनाथ बाळू बटवाल यांच्या शेतातलं हे रताळं. जे चर्चेचा विषय ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी बटवाल आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतीमध्ये रताळ्याची काढणी करत होते. त्यावेळी त्यांना हे अनोखं रताळं हाती लागलं. या रताळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.आता या रताळ्याचं वजन नेमकं आहे तरी किती हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. या रताळ्याचं वजन तब्बल 5 किलो 330 ग्रॅम आहे.

काँग्रेस भाकरी फिरवणार! नाना पटोलेंचं पद जाणार? प्रदेशाध्यक्षपदी ही नावं चर्चेत

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही माहिती समोर आली. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये फेरबदल होऊ शकतात. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री सतेज पाटील आणि प्रदेश माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यामध्ये अशोक चव्हाण यांचे पारडे जड मानले जात आहे.

फडणवीसांच्या 2700 कोटींच्या घोषणेनंतर पंढरपूरकरांना सतावतेय भीती

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पंढरपूरच्या विकासासाठी 2700 कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर पंढरपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या नावाखाली कॉरिडॉरच राबवला जाणार का? अशी शंका आता व्यक्त होऊ लागलीय.पंढरपूरकरांच्या विरोधानंतर प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना त्यांचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. सध्या सरकारकडे स्थानिकांचा विकास आराखडा आणि प्रशासनाचे तीन आराखडे प्रस्तावित आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेले 2700 कोटी रुपयांमधून नक्की कोणता विकास आराखडा राबवला जाणार आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. स्थानिक प्रशासनाकडे देखील याची माहिती नाही. त्यामुळे यामध्ये संभ्रम अधिक वाढला आहे.

धनुष करणार राम देव बाबांवर बायोपिक?

साऊथ मधील फेसम अभिनेत्यांमधलं एक नाव म्हणजे धनुष. अभिनेत्याने ना केवळ साऊथ सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली तर हिंदी सिनेमातही त्यानं प्रसिद्ध मिळवली. रांझणा या सिनेमानं धनुषला बॉलिवूडमध्ये नवी ओळख निर्माण करू दिली. धनुषच्या या सिनेमानं त्याची फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात वाढली. धनुष हा सर्वाधिक फॅन फॉलोविंग असलेल्या कलाकारांमधील एक आहे. प्रोफेशनल लाइफबरोबर त्याची पर्सन लाइफ देखील चर्चेत असते. नुकताच धनुषला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. नेहमीच हँडसम लुकमध्ये दिसणाऱ्या धनुषचा यावेळी वेगळाच अवतार पाहायला मिळाला. त्याला ओळखणचं कठीण झालं होतं. त्याचा एअरपोर्टवरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.धनुषचा नवा लुक पाहून नेटकऱ्यांना रामदेव बाबांची आठवण जाली आहे. धनुषचा असा अवतार पाहून एका युझरनं लिहिलंय, “मला वाटत धनुष रामदेव बाबांचा बायोपिक करतोय”. तर आणखी एका युझरनं, “राम देव बाबांचे कपडे घालून यायचं ना”, असं म्हटलंय.

दिल्लीत अल्पवयीन मुलीवर चाकूचे २० वार आणि दगडाने ठेचलं! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

एका अल्पवयीन मुलीची दिल्लीत अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर चाकूचे २० वार करण्यात आले. तसंच नंतर दगडाने ठेचून तिला ठार करण्यात आलं. या प्रकरणी या मुलीला मारणाऱ्या साहिल नावाच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. बुलंदशहरमधून आज दुपारी त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या घटनेत हा साहिल नावाचा मुलगा त्या मुलीला भोसकतो आणि दगड डोक्यात घालून तिची हत्या करतो हे दिसतं आहे. शिवाय आजूबाजूने लोक जात आहेत पण कुणीही तिला वाचवत नाही किंवा त्या मुलाला अडवत नाहीत हेदेखील स्पष्ट दिसतं आहे.

इस्रोची पुन्हा चंद्रावर स्वारी, चांद्रयान-३ मोहिमेचा अखेर महिना ठरला

इस्रोची महत्त्वकांक्षी मोहिम म्हणून चांद्रयान ३ कडे बघितले जात आहे. चंद्रावर अलगद यान उतरवणे आणि त्यामधून रोव्हरने बाहेर येत चांद्र भूमीवर संचार करणे अशी ही मोहिम असणार आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर चंद्रावर रोव्हर धावणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीनने ही तंत्रज्ञानाची कमाल केली आहे.२०१९ च्या जुलैमध्ये चांद्रयान २ मेहिमेत इस्रोने असाच प्रयत्न केला होता. एक उपग्रह चंद्राभोवती प्रक्षेपित केला होता, जो अजुनही चंद्राभोवती फिरत असून चंद्राचा नकाशा तयार करण्याचे तसंच चंद्रावरील खनिज-मुलद्रव्य, चंद्राभोवती असलेल्या अवकाशातील घडामोडींबद्दलची माहिती गोळा करत आहे. या मोहिमेत चंद्रावर ‘विक्रम’ नावाचा लँडर – यान उतरवण्याचा प्रयत्न केला. याच लँडरमधून ‘प्रज्ञान’ नावाचा रोव्हर बाहेर पडणार होता. मात्र विक्रम यान अलगद न उतरता चंद्रावर आदळले होते आणि त्याचे तुकडे झाले होते.आज ( सोमवारी ) इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ही मोहिम जुलै महिन्यात प्रत्यक्षात येणार असल्याचं जाहिर केलं आहे. पण जुलै महिन्यात नक्की कधी याची घोषणा जरी केली नसली तरी १२ जुलै ला चांद्रयान ३ अवकाशात झेप घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर सर्व काही सुरळीत झाले तर २३ ऑगस्टला चांद्रयान ३ मधील लँडर हे चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न असणार आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.