ऑस्ट्रेलियचा माजी ऑल राऊंडर अँड्र्यू सायमंड्स याचं निधन झालं आहे. शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये झालेल्या कार अपघातामध्ये सायमंड्सचा मृत्यू झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी गेल्या 3 महिन्यातील हा तिसरा धक्का आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी विकेट किपर रॉड मार्श , लेग स्पिनर शेन वॉर्न यांच्यानंतर सायमंड्सच्या जाण्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान झालं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाऊन्सविलेजवळ सायमंड्सच्या कारला अपघात झाला. त्याची कार एलिस नदीच्या पुलावरून बाहेर आली आणि खाली पडली. सायमंड्स स्वतः कार चालवत होते. स्थानिक आपत्कालीन सेवांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
ऑस्ट्रेलियाकडून 26 टेस्ट आणि 198 वन-डे सामने खेळणाऱ्या सायमंड्सनं क्रिकेट विश्वावर मोठा ठसा उमटवला. तो 1999 ते 2007 या कालावधीमध्ये क्रिकेट विश्वावर एकछत्री राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा सदस्य होता. सायमंड्सनं टेस्ट क्रिकेटमध्ये 2 शतक आणि 10 अर्धशतकांसह 1462 रन केले. तर वन-डेमध्ये 6 शतक आणि 30 अर्धशतकांच्या मदतीनं 5088 रन त्याने काढले.