थॉमस कप बॅडमिंटन 2022 चा फायनल
सामना अखेर भारताने जिंकला
थॉमस कप बॅडमिंटन 2022 चा फायनल सामना अखेर भारताने जिंकला आहे. 73 वर्षांनी हा कप जिंकत भारताने इतिहास रचला आहे. बँकॉकच्या इम्पॅक्ट एरिनामध्ये ही स्पर्धा सुरु होती. या सामन्यांमध्ये भारतासमोर इंडोनेशियाची टीम होती. अखेरच्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतने जोनातन क्रिस्टीचा पराभव करत सरळ 3-0 ने सामना जिंकला.
पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुकाचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. दुसऱ्या दुहेरीत सात्विकसाईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवला. तिसरा सामना पुन्हा एकेरीचा होता. किदाम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा 21-15, 23-21 असा पराभव करत थॉमस कपवर पहिल्यांदा नाव कोरलं.
काँग्रेसचे अध्यक्षपद प्रियंका
गांधी यांच्याकडे जाणार?
काँगेसचे अखिल भारतीय चिंतन शिबीर सुरु असतानाच पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी चिंतन शिबिराच्या माध्यमातून अध्यक्षपदाबाबत ठोस संदेश जनतेत जाणे महत्त्वाचे आहे, असा सूर लावला. आचार्य प्रमोद कृष्णन म्हणाले, राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष व्हावे ही सगळ्यांची इच्छा आहे. हे पद त्यांनी स्वीकारावे यासाठी २ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु ते त्यासाठी तयार नाहीत. ते या पदासाठी राजी नसतील तर प्रियांका गांधी यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्यात यावे असे ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अँड्र्यू
सायमंड्सचा अपघाती मृत्यू
शेन वॉर्ननंतर जगात आपल्या आगळ्या वेगळ्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघात झाला. सायमंड्सच्या निधनानंतर अनेकजण त्याच्या आठवणींना उजाळा देतायत. दरम्यान अँड्र्यू सायमंड्स त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुले, क्लो आणि बिली आहेत. शिवाय त्याच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा झाला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू कोटींची संपत्ती मागे ठेवून गेला आहे. जगातील सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सायमंड्सची संपत्ती पाच दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये म्हटलं तर सायमंड्स 38 कोटी 74 लाखांपेक्षा जास्त संपत्तीचा मालक आहे.
पुढील २४ तासांत ११५.४ मिमी
पाऊस होण्याची शक्यता
आज भारतीय समुद्रातील काही भागांत मान्सून धडकणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. येत्या काही दिवसांत संबंधित प्रदेशांत नैऋत्य मोसमी वारे अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याच्या साथीनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ तासांत याठिकाणी ६४.५ मिमी ते ११५.४ मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
माणिक साहा यांनी घेतली
बिप्लव कुमार देव यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्रिपुरा भाजपाचे प्रमुख माणिक साहा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. माणिक साहा यांनी आगरतळा येथील राजभवनात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले माणिक हे भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत. याशिवाय ते त्रिपुरा भाजपाचे प्रमुख देखील आहेत. सहा वर्षांपूर्वी माणिक सहा यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
२०२२ चे पहिले
चंद्रग्रहण आज
२०२२ चे पहिले चंद्रग्रहण या शनिवार आणि रविवार, अर्थात १५ मे आणि १६ मे रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, १६ मे रोजी सकाळी ०७.०२ वाजता ग्रहण होईल आणि दुपारी १२.२० वाजता समाप्त होईल. मात्र, चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. नासाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या पूर्वेकडील अर्धा भाग आणि संपूर्ण दक्षिण अमेरिकेला चंद्रग्रहणाचा प्रत्येक टप्पा पाहण्याची संधी मिळेल. संपूर्ण आफ्रिका, पश्चिम युरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि बहुतेक उत्तर अमेरिकेत दृश्यमान होईल असं यूएस स्पेस एजन्सीने सांगितले आहे.
अभिनेत्री केतकी चितळेला
18 मे पर्यंत पोलिस कोठडी
अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. शनिवारी केतकीला अटक करण्यात आली. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे केतकीला शरद पवारांविरोधात पोस्ट करणं महागात पडलं आहे. न्यायाधीश वी. वी. राव-जडेजा यांच्यासमोर केतकीची सुनावणी झाली. केतकी चितळे हिला न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यूयॉर्कमधील सुपरमार्केटमध्ये
गोळीबार १० जणांचा मृत्यू
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये भीषण गोळीबार झाला असून, त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले. बफेलो येथील जेफरसन अव्हेन्यूजवळ गोळीबार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान हल्लेखोर पकडला गेला आहे. पोलीस आणि इतर आपत्कालीन सेवांनी या घटनेवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आणि लोकांना येथे येण्याचे टाळण्यास सांगितले आहे.
शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ‘वर्षा’वर खलबतं, नेमकं काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. तिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत राज्यसभेची निवडणूक हा प्राथमिक आणि महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा असणार आहे. राज्यसभेची निवडणूक आगामी काळात येऊ घातली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या निवडणुकीबाबत घोषणा देखील झाली आहे. येत्या 10 जूनला राज्यसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
साईचं दर्शन घेऊन जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, बसच्या धडकेत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
अहमदनगर जिल्ह्यामध्ये मन हेलावून टाकणारा अपघात घडला आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नगर मनमाड महामार्गावर एका बसने कारला जोराची धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे, परंतु, वाटेतच दोघांचाही मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर-मनमाड मार्गावर आज दुपारी हा भीषण अपघात घडला. मध्य प्रदेशमधील एक कुटुंब शिर्डीमध्ये दर्शनासाठी आले होते. शिर्डीत दर्शन घेऊन शनि शिंगाणापूरला हे कुटुंब कारने चालले होते. राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळ पोहोचले असता या भाविकांच्या गाडीला बसने उडवले.
‘गिरीश महाजन शिवसेनेला बेडूक म्हणतात, मग बेडकाबरोबर कसे काय जातात?’, एकनाथ खडसेंच्या कानपिचक्या
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी संध्याकाळी मुंबईच्या बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी गिरीश महाजन यांची जीभ घसरली. शिवसेना म्हणजे गटारातली बेडूक, असा घणाघात गिरीश महाजनांनी केला. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा देखील उल्लेख केला. गिरीश महाजन अनेकदा गुलाबराव पाटील यांच्यासोबत भेटून चहा घेतात, जेवण करतात. ते बेडका बरोबर कसे काय जातात? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.
SD social media
9850 60 3590