आज दि.७ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

राज बब्बर यांना 2 वर्षांची शिक्षा; एमपी एमएलए कोर्टाचा मोठा निर्णय

चित्रपट अभिनेता आणि काँग्रेस नेता राज बब्बर यांना एमपी एमएलए कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच कोर्टाने त्यांना 8500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. राज बब्बर सरकारी कार्यात अडथळ आणणं आणि मारहाण प्रकरणात दोषी आढळले होते. कोर्टाकडून निर्णय दिला जात असताना राज बब्बर तेथे उपस्थित होते.

2 मे 1996 मध्ये मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये एफआयआर दाखल केला होता. राज बब्बर तेथून सपातून उमेदवार होते. मतदान अधिकाऱ्याला मारहाण करण्याच्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, राज बब्बर हे समर्थकांसह मतदान स्थळी घुसले आणि मतदान प्रक्रियेत अडथळा आणला. याशिवाय ड्यूटीवर असलेल्या लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागले. यादरम्यान श्रीकृष्ण सिंह राणा यांच्याशिवाय पोलिंग एजेंट शिव सिंह हेदेखील जखमी झाले होते.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा; ४० पेक्षा जास्त मंत्र्यांच्या बंडखोरीनंतर सरकार कोसळले

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॕन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली आहे. जो पर्यंत नव्या पंतप्रधानांची घोषणा होत नाही, तोपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत. “मला माझ्या कामगिरीचा प्रचंड अभिमान आहे, जोपर्यंत नवीन नेता येत नाही तोपर्यंत मी काम करत राहीन”, असं मत बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केलं आहे

“केवळ डिग्रीसाठीच नाही तर देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षण आवश्यक”; शिक्षा संगम इथे PM मोदींचं प्रतिपादन

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यपीठात  नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 वर तीन दिवसीय चर्चासत्राचं उद्घाटन केलं. यामध्ये उदघाटनावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना उद्देशून काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. तरुणांनी केवळ पदवीसाठीच तयार नाही, तर देशासाठी योगदान दिले पाहिजे आणि देशाला पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण मानव संसाधन बनले पाहिजे असं मोदींनी म्हंटलं आहे.संकुचित विचारप्रक्रियेच्या मर्यादेतून शिक्षणाला बाहेर काढणे आणि 21 व्या शतकातील आधुनिक विचारांशी एकरूप करणे हे या धोरणामागील मूलभूत उद्दिष्ट असल्याचे ते पुढे म्हणाले. ते पुढे म्हणाले की NEP 2020 हा देशातील शिक्षण व्यवस्थेला दिशा देण्यासाठी एक रोडमॅप असेल.

ठाणे जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रीपदे, प्रताप सरनाईक आणि बालाजी किणीकर यांचीही लॉटरी लागणार?

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यातील पहिल्या टप्प्याचा विस्तार हा आषाढी एकादशीच्या आधी होणार आहे. याचाच अर्थ येत्या 10 जुलैच्या आधी शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्प्याच्या विस्तारातील 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला जास्त मंत्रीपदे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विठुराया वारकऱ्यांचा कैवारी, अपघातात वाचवलं, नंतर मुख्यमंत्र्यांकडून मोठी मदत

जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावल्यानंतर खडबडून जागे झालेले बंडखोर आमदार अनिल बाबर वारकऱ्यांच्या भेटीला धावले आहेत. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात अनिल बाबर यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आमदार बाबर यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडून जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी 25 हजारांची मदत जाहीर केली आहे.

नदीत कोसळलेली कार सापडली; दोघांना वाचवण्यासाठी ITBP चे थरारक प्रयत्न

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील बाबेलीजवळ एक अल्टो कार बियास नदीत बुधवारी कोसळली. या अपघातात दोन जण वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. आयटीबीपीच्या तुकडी – 2 बटालियनच्या जवानांनी ही कार आता शोधून काढली असून या कारमधील लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बियास नदीचा प्रवाह जोरदार वाहत असतानाही या कारचा शोध घेऊन बचाव कार्य चालू आहे. नदीत एका ढिगाऱ्यावर अडकलेल्या कारपर्यंत पोहोचण्यात लष्कराला यश आले आहे. 6 जुलै रोजी हनुमान मंदिर एनएच-3, चंदीगड मनाली हायवेजवळ 3 प्रवाशांसह कार नदीत पडली होती. याआधी बचावलेल्या बचावलेल्या चालकाला कुल्लू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘…हा तर संविधानाचा अपमान’, मुख्यमंत्री कार्यालयातील पुजेवर अमोल मिटकरींची टीका

महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भुकंपानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मागच्या गुरूवारी या दोघांचा शपथविधी सोहळा पार पडला, यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच त्यांच्या शासकीय कार्यालयात आले. मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारण्याआधी त्यांनी पूजा केली आणि मगच कार्यालयात प्रवेश केला. पण आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या पुजेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे.’एकनाथ शिंदे धार्मिक आहेत, याबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण महाराष्ट्राचं शासकीय कामकाज भारतीय संविधानावर चालतं. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पूजा आणि विधीचे अधिकार आपल्या घरातच असावेत. सेक्युलर राष्ट्रामध्ये पूजा केली जात असेल, तर हे निंदनीय आहे. शासकीय कार्यालयात धार्मिक विधी होता कामा नये, हा संविधानाचा अपमान आहे,’ असं अमोल मिटकरी म्हणाले.

विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या ९ काँग्रेस आमदारांना पक्षाकडून नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. यापैकी ९ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नऊ आमदारांचा यात समावेश आहे.विश्वासदर्शक ठरावावर सकाळी ११ वाजता मतदानास सुरुवात झाली होती. सभागृहात आमदारांची उपस्थिती राहील याची खबरदारी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने घेतली होती. मात्र, काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख आदी आमदार विलंबाने पोहोचले. त्यांना बाहेर लॉबीतच थांबावे लागले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच विरोधकांची मते अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी पडल्याने कोण गैरहजर आहे याचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसचे नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते. दोन जण पूर्वकल्पना देऊन गैरहजर होते.

इंग्लंडमध्ये ठरणार विराटचे भवितव्य! टी २० विश्वचषकात खेळण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमावारीमध्ये सलग सहा वर्षे पहिल्या १० फलंदाजांमध्ये असलेला विराट कोहली काल पहिल्यांदाच १३ व्या स्थानावर घसरला. एकदिवसीय आणि टी २० क्रमवारीमध्येदेखील कधीकाळी ‘बादशाह’ असलेला विराट सातत्याने खाली घसरताना दिसत आहे. आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडणारा विराट गेल्या काही काळापासून एक-एक धाव जमा करण्यासाठी झगडताना दिसत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकामध्ये त्याला संधी मिळणार की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. असे म्हटले जात आहे की, इंग्लंडविरुद्ध असलेल्या टी २० आणि एकदिवसीय मालिकांमधील कामगिरीवर त्याचे भवितव्य ठरणार आहे.

सांगली : रेल्वेची धडक बसल्याने दोन माकडांचा मृत्यू

भरधाव रेल्वेने धडक दिल्याने दोन माकडांचा गुरुवारी दुपारी बळी गेला, तर एक पिलू गंभीर जखमी झाले. ही घटना मिरजेजवळ इनाम धामणी हद्दीत घडली. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वीस ते पंचवीस माकडांचा कळप लोहमार्गावर होता. याचवेळी कोल्हापूरहून गोंदियाला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस मिरजेकडे येत होती. धामणीला जाणाऱ्या भुमीगत रस्त्यावरील पुलावर असलेला कळप रेल्वे आल्याने लोहमार्गावरुन धावत सुटला.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.