उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात सगळ्यात आधी पंतप्रधानांनी अक्षय पात्र माध्यान्ह भोजन व्यवस्थेचं उद्घाटन केलं. एलटी कॉलेज परिसरात केंद्र सरकारकडून मुलांच्या माध्यान्ह भोजनासाठी अत्याधुनिक किचन तयार करण्यात आलं आहे. या किचनमध्ये 4 तासांत एक लाख मुलांसाठीचं जेवण तयार होऊ शकतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीत मिळालेल्या यशाचं रिटर्न गिफ्ट ते काशीवासीयांना देणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान अनेक विकासकामांची पायाभरणी करणार आहेत. त्यापैकी ‘अक्षय पात्र माध्यान्ह भोजन रसोई’चं उद्घाटन त्यांनी (7 जुलै ला) केलं. वाराणसीतल्या अर्दली बाजारमधल्या एलटी कॉलेजच्या परिसरात अक्षय फाउंडेशनकडून हे अत्याधुनिक स्वयंपाकघर तयार करण्यात आलं आहे. हे किचन अत्याधुनिक आहे. तिथे 4 तासांत एक लाख मुलांसाठी स्वयंपाक तयार करता येऊ शकतो. पंतप्रधान मोदी यांनी त्याचं लोकार्पण केलं. सध्या या किचनमध्ये 27 हजार मुलांसाठीचं माध्यान्ह भोजन तयार केलं जाणार आहे. यात स्वयंपाकासाठी अत्याधुनिक उपकरणं आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात भरपूर जेवण तयार करता येऊ शकेल. या किचनमध्ये एक तासात 40 हजार गरम पोळ्या तयार होऊ शकतात, तर केवळ 45 मिनिटांत 130 किलो भात शिजवता येऊ शकतो. तिथे 1200 किलो वरण आणि भाजी तयार करायला केवळ दीड तासच पुरतो.
माध्यान्ह भोजन रसोईमध्ये प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी स्वतंत्र उपकरण आहे. अगदी पोळ्यांसाठी कणीक भिजवण्यापासून ते डाळ-तांदूळ आणि भाजी धुण्यापर्यंत सगळी कामं मशीनद्वारेच केली जातात. मसाला वाटण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठीही वेगवेगळी मशीन्स आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज या सेवेचं उद्घाटन केलं. उद्यापासून (8 July) वाराणसीच्या सेवापुरी ब्लॉकमधील 48 शाळांमध्ये या व्यवस्थेत तयार झालेलं माध्यान्ह भोजन दिलं जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या उद्घाटनावेळी जवळपास 20 शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला व या अत्याधुनिक किचनविषयी अभिप्राय घेतला. यानंतर लोकप्रिय बनारस शिक्षण पद्धतीविषयी पंतप्रधान चर्चा करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत अनेक विकासकामांची पायाभरणी करणार आहेत. गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी काशीवासीयांचं जगणं आरामदायी करण्याच्या दृष्टीनं अनेक विकासकामं दृष्टिपथात आणली आहेत.