महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही : मुख्यमंत्री

केंद्र सरकारला काय करायचं ते करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्यापाठी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही ग्वाही दिली. केंद्र सरकारला काय करायचं ते करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्या हक्काचं सरकार आहे. तुमच्याच मेहनतीने राज्य, देश आणि जग चालत आहे, असं सांगतानाच शेतकरी राज्याचं वैभव आहे. आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठी आहे. अन्नदाता आणि जीवदाता एकच आहेत. आर्थिक संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत करणारच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना प्रयोगशील होण्याचं आवाहन केलं. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने जपानमधील आंबा पिकवल्याची बातमी दाखवली. तुम्ही प्रयोगशील व्हा. तुमच्या प्रयोगासाठी आम्ही मदत करू. शेतीक्षेत्रासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू, असं सांगतानाच शेतकरी कायमचा चिंतामुक्त झाला पाहिजे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर राहता कामा नये. ज्या दिवशी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहील तेव्हाच राज्यात हरित क्रांती झाली असं म्हणता येईल, असं ते म्हणाले.

शेतकऱ्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आपल्या सरकारच्या टीमच्या कामाला दाद देत असताना लाखो शेतकऱ्यांचेही कौतुक आहे. सोन्यासारखे पीक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते. अशा अनिश्चित परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही कामकाजाची सुरुवात पीक कर्ज मुक्तीपासून केली. नंतर कोरोनाचे संकट आले. पण शेतकऱ्याने अर्थव्यवस्थेत जे योगदान दिले त्याचे उपकार विसरता येणार नाही. आम्ही विकेल ते पिकेल ही योजना घेऊन आलो. जे पिकवीन ते विकल्या गेलेच पाहिजे असे ठरवले, असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.