आशिया कपमधून भारताच्या वाईट कामगिरीमुळे टीम इंडियाला बाहेर पडावं लागलं. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघालाही म्हणावी तेवढी चांगली कामगिरी करण्यात यश मिळालं नाही. महिला भारतीय क्रिकेट टीमचा इंग्लंड विरुद्ध पहिला टी २० सामना नुकताच पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ९ विकेट्सने टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवला.
चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर शनिवारी भारत विरुद्ध इंग्लंड सामना झाला. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी मिळवली आहे. या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये टीम इंडिया फेल ठरली.
प्रथम फलंदाजी करताना भारताने यजमानांसमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवलं. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक धावा केल्या. तिने 29 धावांची नाबाद खेळी केली. इंग्लंड महिला क्रिकेट टीममधील सारा आणि सोफिया या दोघांनी मिळून हे लक्ष्य पूर्ण केलं. मालिकेतील पुढील सामना 13 सप्टेंबर रोजी डर्बी येथील काउंटी मैदानावर होणार आहे.
इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. स्मृती मंधानाने २३ तर शेफालीने १४ धावा केल्या. ४ ओव्हरमध्ये ३० धावा काढल्या. मात्र दोघींही मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरल्या. मिडल ऑर्डरने मात्र घोळ घातला. याचा फायदा इंग्लंडने उचलला.
हरनप्रीत २० धावा करून तंबुत परतली. दीप्तीने सर्वाधिक म्हणजे २४ बॉलमध्ये २९ धावा केल्या. इंग्लंडच्या सारा ग्लेनने ४ विकेट्स घेतल्या. साराने फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली.