जगातील सर्वात मोठा परिवार म्हणून भारतातील मिझोरम येथील चाना परिवाराला ओळखले जाते. या परिवाराचे मुखिया जिओना चाना (Ziona Chana) यांच रविवारी वयाच्या 76 व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसांपासून मधुमेह आणि अतिताणामुळे जिओना आजारी होते. मिझोरमच्या मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी ट्विट करत या वृत्ताची पुष्टी केली. त्यांनी ट्विटद्वारे जिओना यांना श्रद्धांजली वाहिली.
जिओना हे 76 वर्षांचे होते. त्यांना तब्बल 38 बायका, 89 मुलं आणि 33 नातवंड होती. मागील काही दिवस त्यांचा मधुमेहाचा त्रास वाढला होता. सोबतच त्यांना अतिताणाचाही त्रास होता. ज्यामुळे रविवारी त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यामुळे घरीट उपचार घेणाऱ्या जिओना यांना त्वरीत ऐझालच्या त्रिनिटी रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे आणताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाचे डायरेक्टर डॉ. लल्रिन्ट्रुंगा यांनी पीटीआयला याबाबतची माहिती दिली.
मिझोरमच्या मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी जिओना यांच्या जाण्याची माहिती ट्विट करत दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं,”दुखद मनाने आम्हाला 38 बायका आणि 89 मुलं असणाऱ्या आमच्या जिओना चाना यांना श्रद्धांजली वाहावी लागत आहे. मिझोरमधील बकत्वांग हे गाव जिओना यांच्यामुळे एक पर्यटन स्थळ बनलं होतं. जिओना यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”