कोरोना काळात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले वैद्यनाथ मंदिर बंद आहे. यामुळे शेकडो कुटुंबांच्या रोजीरोटीच्या अनेक समस्या उभ्या राहिल्या आहे. त्यामुळे सर्व सुरु झालं तर मग मंदिरं सुरु करण्यातच अडचणी काय? अस सवाल भाविकांनी केला आहे.
कोरोना काळात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले वैद्यनाथ मंदिर बंदच आहे. सध्या या मंदिरांची दारं बंद असल्याने अनेक भाविक श्रद्धा पायरीला दर्शन घेऊन जात आहेत. मंदिरे बंद झालीत तशी अनेकांची जगण्याची दारे देखील बंद झाली आहेत. या देऊळ बंदने अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. या देवस्थानावर अवलंबून असलेली छोटी मोठी व्यवसाय करणारी शेकडोच्या शेकडो कुटुंबं आता अस्वस्थ आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी परळीचे प्रभू वैद्यनाथ मंदिर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. बंदचा हा कालावधी आणखी किती दिवस राहणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. बीड जिल्ह्यात सर्व काही सुरू करण्यात आले आहे, मात्र जिल्हाधिकाऱ्यांन मंदिराबाबत कोणतेही आदेश अद्याप काढलेले नाहीत. प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातील आणि देशातील भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर बंद असले तरी दैनंदिन पूजा विधी पुजाऱ्यांच्या मार्फत चालू आहे.
मात्र वैद्यनाथ मंदिर बंद असल्यानं अनेकांची जगण्याची दारे देखील बंद झाली आहे. मंदिर परिसरात असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिक, गाडी लावून छोटे व्यावसाय करणारे व्यावसायिक, परिसरातील चहाचे ठेले, फुलवाले, प्रसादविक्री, अॅटोचालक, पुरोहित, मंदिर प्रशासनात कामं करणारी कामगार, स्वच्छता कर्मचारी, पुरोहितवर्ग, हॉटेल व्यावसायिक, भक्तनिवास आणि त्यावर आधारित छोट्या छोट्या सेवा देणारे व्यावसायिक अशा शेकडो कुटुंबाची कुचंबणा होत आहे. अनेक मंदिरावर मोठं अर्थचक्र अवलंबून आहे. मात्र “परळीत देऊळ बंद”मुळे रोजीरोटीच्या अनेक समस्या समोर उभ्या राहिल्या आहेत.