जागतिक मंदीचे पुन्हा एकदा संकेत मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या म्हणावी तेवढी चांगली परिस्थिती नाही. एकीकडे लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येत आहे. कोरोनानंतर जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती म्हणावी तेवढी सुधारलेली नाही. त्यात रशिया युक्रेन युद्धाचेही संपूर्ण जगावर होत असलेले परिणाम पाहायला मिळत आहेत.
महागाई वाढत चालली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा US फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात सातव्यांदा वाढ केली आहे. ही वाढ 0.50 टक्क्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. फेड रिझर्व्हने पुन्हा एकदा पॉलिसी रेट वाढवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री फेड रिझर्व्हने पॉलिसी रेटमध्ये 0.50% वाढ करण्याची घोषणा केली.
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने यंदा सलग सातव्यांदा पॉलिसी रेटमध्ये वाढ केली आहे. तसे पाहिले तर यावेळी दरवाढ पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. पण फेड रिझर्व्हनेही आणखी दर वाढीचे संकेत दिले आहेत.
पॉलिसी रेटमध्ये अर्धा टक्का वाढ झाल्यानंतर अमेरिकेतील बेंचमार्क रेट 4.25% वरून 4.5% पर्यंत वाढला आहे. गेल्या 15 वर्षांतील हा उच्चांक असल्याची चर्चा आहे. याआधी फेड रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ केली होती.
कामी काळात बेंचमार्क दर 2023 च्या अखेरीस 5% ते 5.25% दरम्यान पोहोचू शकतो. पुढील तीन तिमाहींसाठी, फेड रिझर्व्ह हा दर 1% ने वाढवू शकतो आणि पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत तो कायम ठेवू शकतो. दर वाढविल्यास ग्राहक व व्यावसायिक कर्जे महाग होतील. त्यामुळे मंदीचा धोका अधिक वाढू शकतो.
US फेडरल बँकेच्या घोषणेपूर्वीच भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 0.35 टक्क्यांनी रेपो रेट वाढवला आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही वाढ केली आहे. तर फेब्रुवारीमध्ये पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ होऊ शकतात असे संकेतही देण्यात आले आहेत.
याचा शेअर मार्केटवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय सोनं-चांदीवर काय परिणाम होतो हे देखील पाहावं लागेल. येत्या काळात आणखी महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता वस्तू आणि सेवा महाग होऊ शकतात. त्यामुळे खिशाला चांगलीच कात्री बसू शकते.