इस्राईलच्या संसदेने नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मंजूरी दिलीय. नफ्ताली बेनेट यांनी 60 विरुद्ध 59 मतांनी इस्राईलच्या संसदेत विश्वासमत ठराव जिंकला. यासह इस्राईलच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या बेंजमिन नेतन्याहू यांची सत्ता संपुष्टात आलीय. बेनेट यांनी बहुमत सिद्ध करत एका दशकानंतर बेंजमिन यांना सत्तेवरुन खाली खेचत वेगळ्या पक्षाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा केलाय. यामुळे इस्राईलच्या राजकारणातील बेंजमिन यांच्या पकडीला सुरूंग लागलाय.
इस्राईलचे माजी पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू आंतरराष्ट्रीय राजकारणातही चांगलेच चर्चित नेते ठरले. ते आपल्या कार्यकाळात जागतिक राजकारणात चांगलेच सक्रीय असलेले दिसले. इस्राईलचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदाचा मान बेंजमिन यांनाच जातो. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर इतके वर्षे सत्तेत राहिलेल्या नेतन्याहू आणि त्यांचा लिकुड पक्षाला आता विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. बेंजमिन हेच लिकुड पक्षाचे विधीमंडळ नेते आणि संसदेचे विरोधी पक्षनेते असतील.
बेंजमिन नेतन्याहू यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरुन खाली येणं आवडलेलं दिसत नाही. त्यामुळेच बहुमत सिद्ध झाल्यानंतर सरकार अजून स्थापनही झालेलं नाही तेच नेतन्याहू यांनी सरकार पाडणार असल्याचा इशारा द्यायला सुरुवात केली. नेतन्याहू यांनी नव्या सरकारवर फसवणूक करुन युती केल्याचा आरोप केलाय.
नेतन्याहू सत्ता गेल्यानंतर नव्या सरकारवर आरोप करत असले तरी त्यांच्या स्वतःवरच अनेक गंभीर आरोप झालेले आहेत. या प्रकरणांचा तपास सुरू असून काही प्रकरणात न्यायालयात खटलेही सुरू आहेत. नेतन्याहू यांच्यावर लाचखोरी, फसवणुकीसह विश्वासघातासारखे अनेक आरोप आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात खटलेही सुरू आहेत. मात्र, नेतन्याहू यांनी त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा केलाय.