सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत अव्वलस्थानी जिंदाल ग्रुपच्या चेअरमन सावित्री जिंदाल यांची वर्णी लागली आहे. फोर्ब्सने अब्जाधीश 2022 क्रमवारी नुकतीच घोषित केली आहे. यंदाच्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत चार नवीन महिलांचा समावेश झाला आहे. संपूर्ण क्रमवारीचा जागतिक स्तरावर विचार करता एकूण अकरा महिलांनी जागतिक श्रीमंतांच्या क्रमावरीत स्थान निश्चित केलं आहे.
नव्यानं क्रमावारीत स्थान पटकाविणाऱ्यांत सौंदर्य आणि फॅशन जगतातील आघाडीची कंपनी नायकाच्या सर्वेसर्वा फाल्गुनी नायर यांचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पुरुष ठरले आहेत. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचा आकडा 90.7 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत अंबानी दहाव्या स्थानावर आहेत.
अदानी ग्रूपचे सर्वेसर्वा 90 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह आशिया खंडातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जागतिक क्रमवारीत अदानी अकराव्या स्थानावर आहेत.
यंदाच्या वर्षी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत एकूण 327 महिलांनी स्थान पटकावलं आहे. भारतातील अब्जाधीश महिला मुख्यत्वे औषधनिर्माण क्षेत्रातील आहे. यादीतील अन्य नावांमध्ये लीना तिवारी, किरण मुजमदार शॉ आणि स्मिता कृष्णा-गोदरेज हे देखील सहभागी आहेत.
फाल्गुनी नायर या स्वयंउद्यमी मानल्या जातात. त्यांची एकूण संपत्ती 4.4 अरब डॉलरच्या घरात आहे. संपत्तीच्या दृष्टीनं त्यांच स्थान जागतिक क्रमवारीत 653 व्या स्थानावर आहे. जागतिक क्रमवारीत 682 व्या स्थानावर असलेल्या लीना तीवारी देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती 4.2 अब्ज डॉलर आहे. किरण मुजूमदार शॉ यांची एकूण संपत्ती 3.3 अरब डॉलर आहे.
सावित्री देवी जिंदाल या एक भारतीय उद्योगपती आणि राजकारणी आहे. सध्या ओ.पी.जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. सावित्री जिंदाल अग्रोहा येथील महाराजा अग्रसेन मेडिकल कॉलेजच्या अध्यक्षाही आहेत. पतीच्या निधनानंतर जिंदाल ग्रूपची कमान त्यांनी समर्थपणे सांभाळत कंपनीचा महसूल चौपट झाला. व्यवसायाच्या चार विभागांपैकी प्रत्येक विभाग त्यांची चार मुले पृथ्वीराज, सज्जन, रतन आणि नवीन जिंदाल सांभाळतात. जिंदाल स्टील्स ही भारतातील तिसरी सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी मानली जाते.