डिसेंबर महिना सुरू झाला की हिवाळ्याची कुडकुडणारी थंडी पडू लागते. थंडीमध्ये आपल्या शरीराची, त्वचेची नीट काळजी नाही घेतली तर आपल्याला वेगवेगळे त्वचा विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीला सुरुवात झाल्यावर आपल्या रोजच्या राहणीमानात काही बदल केले, तर याबाबतच्या कोणत्याच तक्रारींचा सामना करावा लागणार नाही. हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? याबाबत कोल्हापूरचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय राऊत यांनी काही मोलाच्या टिप्स दिल्या आहेत.
काय घेणार काळजी ?
या दिवसांमध्ये त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर ती कोरडी पडणे, ओलसरपणा कमी झाल्यानं त्वचेवर चट्टे पडणे, खाज उठणे आदी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच सर्वांनी त्वचेची निगा राखली पाहिजे, असे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले. हे प्रकार टाळण्यासाठी..
1) सामान्य ते कोरड्या त्वचेसाठी पेट्रोलियम जेली किंवा क्रीम-आधारित मॉइश्चरायझर्स हे लोशनपेक्षा चांगले असतात. आंघोळीनंतर आपल्या ओल्या त्वचेवर थेट मॉइश्चरायझर लावा. शरीराच्या पृष्ठभागावरील ओलावा टिकवून ठेवण्यास हे मदत करेल.
2) जास्त वेळा त्वचा धुतल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा नाहीसा होतो. दिवसातून एकदा आपला चेहरा, हात, पाय धुणे पुरेसे आहे. त्याचबरोबर दरवेळी या भागांवर साबण किंवा क्लीन्सर वापरणे आवश्यक नाही.
3) गरम पाणी आणि साबणाचा मर्यादित वापर करा. त्वचेला हिवाळ्यात खाज सुटली असेल तर, कोमट पाण्याने अंघोळ करा. त्यानंतर लगेच मॉइश्चरायझर क्रीम किंवा पेट्रोलियम जेली लावा. त्या आधी हळूवारपणे त्वचा स्वच्छ कोरडी करा.
4) कडाक्याच्या थंडीत बाहेर पडणे टाळा. अती थंड तापमानामुळे काही जणांना त्वचेचे विकार किंवा हिमबाधा होऊ शकतात. वेदना किंवा व्रणांसह तुमच्या हात किंवा पायांच्या रंगात बदल होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
5) हिवाळ्यातील सूर्य देखील त्वचेसाठी धोकादायक असू शकतो. तुम्ही दीर्घकाळ घराबाहेर असाल तर सुर्यापासून बचाव करण्यासाठी योग्य सनस्क्रीन वापरावे. सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामुळे त्वचेचे अकाली वृद्धत्व आणि त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो.
त्वचेची काळजी घेण्यासाठी ही सर्व खबरदारी घेतल्यानंतरही तुमचा त्रास कायम असेल तर कोणताही वेळ न दडवता तातडीनं तत्वचा विकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या, अशी सूचना डॉ. राऊत यांनी केली आहे.