मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडिया अवघ्या 186 रन्सवर ऑलआऊट झाली. प्रत्युत्तरात 136 धावांत 9 गडी गमावल्यानंतरही बांगलादेशने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
2004 साली बांगलादेशने पहिल्यांदा भारतीय संघाविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकला होता. कर्णधारपद सौरव गांगुलीच्या हातात होते. 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया अवघ्या 214 धावांत गारद झाली.
आयसीसी वनडे कर्ल्ड कप 2007 चा सामना कोणताच भारतीय विसरू शकत नाही. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला बांगलादेशने पहिल्याच फेरीतून बाद केलं होतं. बांगलादेशने 191 धावांचे लक्ष्य 48.3 षटकात 5 गडी गमावून पूर्ण करत इतिहास रचला.
महेंद्रसिंग धोनीवरही बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील पराभवाचा कलंक आहे. 2012 आशिया चषक स्पर्धेत 290 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने 49.5 षटकात 5 विकेट गमावून विजय मिळवला.
2015 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दोन सामने गमावले होते. पहिल्या वनडेत 308 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला केवळ 228 धावाच करता आल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांनी 6 गडी राखून विजय मिळवला.
आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा मीरपूरमध्ये बांगलादेशकडून पराभूत झाला. 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने 46व्या षटकात 136 धावांत 9 गडी गमावूनही 1 गडी राखून विजय मिळवला.