अभिनेते सयाजी शिंदे यांचं निसर्गावर अपार प्रेम आहे. हे प्रेम वेळोवेळी दिसून येतं. याच प्रेमापोटी त्यांनी सह्याद्री देवराई मोठ्या कष्टानं उभी केली. मात्र याच देवराईला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकरलेल्या सह्याद्री देवराईत आग लागली आहे. ही आग वेगानं पसरत गेली आणि त्यामुळे तब्बल 5 ते 6 हजार झाडांचं मोठं नुकसान झालं आहे.
सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या बीडमधील पालवन इथल्या सहयाद्री देवराईच्या डोंगराला पहाटे आग लागली. 5 ते 6 हजार झाडं जळाली.
ही नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. पालवनमध्ये तब्बल शंभर एकर डोंगरावर सयाजी शिंदे आणि सामाजिक वनीकरण विभागाने चार वर्षांपूर्वी सह्याद्री देवराईची उभारणी केली होती. 2 वर्षांपूर्वी याठिकाणी वृक्ष संमेलनही भरवण्यात आलं होतं.