गुजरातमधील वडोदरा येथील नंदेसरी GIDC येथील दीपक नायट्रेट कंपनीत स्फोटानंतर आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
वडोदरा शहराबाहेरील नंदेसरी औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्रेट रासायनिक उत्पादन प्रकल्पाच्या एका भागाला गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सात कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कारखान्याच्या आसपास राहणाऱ्या सुमारे 700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
वडोदराचे जिल्हा दंडाधिकारी आरबी ब्रार यांनी सांगितले की, भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे धुराच्या लोळात पडलेल्या सात जणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून कारखान्याजवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे 700 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.
वडोदरा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, संध्याकाळी जेव्हा कारखान्यात आग पसरू लागली तेव्हा एक शक्तिशाली स्फोटही झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.