कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले. तर अनेकांचे व्यवसायही बुडाले. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे आपल्याला दिसत आहे. अशात आता नोकरीच्या आमिषाने पैसे देऊन फसवणूक झाल्याचेही प्रकार समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी ठाणे मनपात नोकरीचे आमिष देऊन 6 तरुणींची फसवणूक झाली होती. त्यांना नोकरीचे बनावट नियुक्तीपत्रही दिले गेले होते. यानंतर ठाण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे अनेक गुन्हे मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी उघडकीस येत आहेत. मात्र, हे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच आता परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवत एकाने तब्बल 7 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ए. श्रीनावासन असं या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्यानं ठाण्यातील रणजितकुमार गणेशन (वय 40) यांना हा गंडा घातला आहे. याप्रकरणी, चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
गणेशन हे ठाण्याताली पोखरण रोड क्रमांक दोन येथील रहिवासी आहेत. त्यांना श्रीनिवासन याने परदेशात उच्च पदावर नोकरी लावून देतो, अशी बतावणी केली. यानंतर त्याने व्हिसा, मेडिकल आणि इतर खर्चासाठी शुल्क म्हणून सात लाख चार रुपयेही त्यांच्याकडून घेतले.
यानंतर रणजीत कुमार यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला. मात्र, तरी त्यांना कोणतीही नोकरी मिळाली नाही तसेच त्यांचे पैसेही श्रीनिवासन याने परत केले नाही. हा संपूर्ण प्रकार 22 एप्रिल ते 20 मे 2022 या दरम्यान घडला.
या सर्व प्रकारानंतर गणेशन यांना आपली फसवणूक झाली, असे लक्षात आले. यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेचच 31 मे 2022 रोजी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.